सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अद्ययावत डिजिटल व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ४ व्हेंटिलेटर मशीन्स रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. पण, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आणखी ३ व्हेंटिलेटर मशीन्स घेण्याचा सेंट जॉर्ज रुग्णालयाचा प्रस्ताव असल्याचं रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितलं.
डिजिटल व्हेंटिलेटर सुविधेचा लाभ लवकरच रुग्णांना घेता येईल. या रुग्णालयातील आयसीयू विभागात १० खाटा असून सर्वांना ही सुविधा देण्यासाठी रुग्णालय प्रशासन प्रयत्नशील असल्याचंही डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केलं. एका व्हेंटिलेटर मशीनची किंमत ९ ते १० लाख रुपये आहे.
महापालिका आणि शासकीय रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर असते, त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. पण, रुग्णालयात चारच व्हेंटिलेटर असल्यानं बऱ्याचदा रुग्णांची गैरसोय होत होती. यासाठीच स्क्रीन टच व्हेंटिलेटर मागविण्यात आले आहेत.
रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण येतात. शिवाय, हे रुग्णालय सीएसटी रेल्वे स्टेशनजवळ असल्यानं रेल्वे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तत्काळ व्हेंटिलेटरची सुविधा द्यावी लागते. अशा वेळी मशीन्स कमी असल्याने रुग्णांना तातडीनं उपचार करता येत नाहीत. म्हणूनच आम्ही नव्या मशीन्स घेणार आहोत. एक मशीन आली असून अजून 3 मागवल्या आहेत.
- डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय
खासगी रुग्णालयात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरसाठी १० हजारांहून जास्त खर्च येतो. रुग्ण बरेच दिवस व्हेंटिलेटरवर असल्यास नातेवाईकांवर प्रचंड आर्थिक भार पडतो. यानंतर रुग्णाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. पण, अशा रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून देता येत नाही, असंही डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
शिवाय, सर्व खाटांना व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध व्हावी, याकरता वर्षभरापूर्वी अतिरिक्त पाच व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकारला लेखी पत्र पाठवलं होतं. यासंदर्भात सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून सरकारनं मान्यता दिल्यानंतर व्हेंटिलेटर विकत घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)