मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. कोस्टल रोडमध्ये एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करून पूल उभारण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून या पुलांखाली १७६ खांबांची उभारणी केली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. जुलै २०२३ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत असेल, अशी माहिती सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली.मुंबई महापालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडसाठी १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत.
हे पूल उभारताना परंपरागत बहुस्तंभीय पद्धतीचा वापर करुन या १७६ खांबांची उभारणी करावयाची झाल्यास प्रत्येक खांबासाठी साधारणपणे ४ आधार स्तंभ यानुसार एकूण ७०४ स्तंभांची उभारणी समुद्रतळाशी करावी लागली असती. यासाठी समुद्रतळाच्या अधिक जागेचा वापर होण्यासह खर्च व वेळ देखील अधिक लागूला असता. मात्र, एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारण्यात येणारे खांब हे तळापासून वरपर्यंत एकच खांब असणार आहेत.
त्यामुळे ७०४ स्तंभांऐवजी १७६ स्तभांची उभारणी केली जाणार आहे. स्तंभांची संख्या कमी झाल्यामुळे समुद्रतळाचा कमीत-कमी वापर होणार असल्याने तुलनेने अधिक पर्यावरणपूरकता साधली जाणार आहे. तसंच स्तंभांची संख्या कमी झाल्यामुळे बांधकामाच्या वेळेत व खर्चात देखील बचत शक्य होणार आहे.
जगभरात ज्या ठिकाणी अशाप्रकारे पुलांची उभारणी करण्यात आली आहे, अशा पुलांचा सविस्तर अभ्यास महापालिका अभियंत्यांच्या चमुने व संबंधीत सल्लागारांनी केल्यानंतर सागरी किनारा मार्गासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री भारतात उपलब्ध नसल्याने ती युरोपातून आयात करण्यात आली आहे.
एकल स्तंभ तंत्रज्ञानानुसार उभारण्यात आलेल्या चाचणी स्तंभांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या टनांचा दाब उभ्या व आडव्या पद्धतीने देण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे स्तंभांची भार वहन क्षमता व धक्के सहन करण्याची क्षमता मोजली जाणार आहे.
हेही वाचा
जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता?
गर्दी टाळा, लसीकरणाचा मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन