Advertisement

जलवाहिन्या तोडल्या, द्या नुकसान भरपाई! महापालिकेचा मेट्रो काॅर्पोरेशनला दणका


जलवाहिन्या तोडल्या, द्या नुकसान भरपाई! महापालिकेचा मेट्रो काॅर्पोरेशनला दणका
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्ग प्रकल्प म्हणजे नेहमीच कोणत्या कोणत्या वादात अडकलेला प्रकल्प. तर दुसरीकडे या प्रकल्पावरून मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) विरूद्ध पर्यावरणवादी, रहिवासी, प्रकल्पबाधित असं चित्र आहे. त्यात आता एमएमआरसी आणि मुंबई महानगर पालिकेतही मेट्रोच्या कामावरून वाद सुरू झाला आहे. मेट्रो-३ च्या कामासाठी खोदकाम करताना जमिनीखालील पालिकेच्या जलवाहिन्यांना फुटत असून महापालिकेला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या 'ए वाॅर्ड'ने आक्रमक पवित्रा घेत 'एमएमआरसी'कडून ११.५० लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल केली आहे.

जलवाहिन्या फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असून दुरूस्तीवरही लाखोंचा खर्च होत आहे. महत्त्वाचं म्हणजे रहिवाशांना त्याचा फटका बसत असून दूषित पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ए वाॅर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी 'एमएमआरसी'कडून ही नुकसान भरपाई वसूल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ७ आॅक्टोबर रोजी 'एमएमआरसी'कडून ११.५० लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल केल्याची माहिती दिघावकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


आणखी रक्कम करणार वसूल

चर्चगेट आणि आसपासच्या भागात गेल्या २ महिन्यांपासून मेट्रो-३ च्या खोदकामामुळे अंदाजे ७ वेळा जलवाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे रहिवासी हैराण झाले असून 'एमएमआरसी'कडे वारंवार तक्रार करूनही 'एमएमआरसी' दाद देताना दिसत नाही. तसेच यामुळे महापालिकेलाही मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. त्याअनुषंगाने महिन्याभरापूर्वी 'ए वाॅर्ड'ने नुकसान भरपाईचा आढावा घेतला.

या नुकसान भरपाईनंतरही, असे प्रकार सुरू असल्याने ए वाॅर्डकडून पुन्हा नुकसान भरपाईचा आढावा घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे नुकसान भरपाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा आकडा अंतिम झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यासंबंधीचं दुसरं पत्र लवकरच 'एमएमआरसी'ला पाठवण्यात येईल, असं दिघावकर यांनी स्पष्ट केलं.


कडक भूमिका घ्यावी लागेल

खोदकाम करताना जलवाहिन्यांसह इतर भूमिगत वाहिन्यांना धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेत काम करण्यासंबंधी सातत्याने 'एमएमआरसी'कडे पालिकेकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र 'एमएमआरसी'कडून जलवाहिन्यांना धक्का पोहोचवण्याचं काम सुरूच आहे. त्यामुळे यापुढे असे प्रकार सुरू राहिले तर कडक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही ए वाॅर्डकडून 'एमएमआरसी'ला देण्यात आल्याचं समजतं. 


काळजी घेतली जातेच

मेट्रो ३ च्या कामादरम्यान भूमिगत वाहिन्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सर्व प्रकारची काळजी 'एमएमआरसी'कडून घेतली जाते आणि यापुढेही घेतली जाईल. पण कामाची व्याप्ती प्रचंड असून कामही मोठे अवघड आहे. तेव्हा कुठेही तर भूमिगत वाहिन्यांचा थोडा धक्का बसतो. पण तरीही यापुढे असे प्रकार घडू नये यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरूच आहेत.

- आर रमण्णा, कार्यकारी संचालक (नियोजन), एमएमआरसी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा