गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरचा पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक केली असून फेब्रुवारीमध्ये बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मोतीलाल नगरमधील रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे.
या पुनर्विकासातून म्हाडाला तब्बल १८ हजार अतिरिक्त घरं उपलब्ध होणार असून ही घर लाॅटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना वितरीत केली जाणार आहेत. त्यामुळे हा पुनर्विकास मोतीलाल नगरच्या रहिवाशांसोबत सर्वसामान्यांसाठी देखील दिलासा देणारा ठरणार आहे.
मोतीलाल नगर १,२ आणि ३ अशी म्हाडा वसाहत १४२ एकर जागेवर वसली आहे. या वसाहतीत ३,७०० रहिवासी राहतात. मोतीलाल नगरमधील रहिवाशांनी अतिरिक्त बांधकाम केल्यासंबंधीच्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं हे अतिरिक्त बांधकाम अनधिकृत ठरवलं आहे. त्यामुळे हे बांधकाम पाडण्याऐवजी रहिवाशांच्या संमतीने म्हाडाने मोतीलाल नगरचा पुनर्विकास करावा, असा आदेश न्यायालयाने २०१३ मध्ये दिला. त्यानंतर म्हाडाने अनधिकृत बांधकामावर हातोडा न मारता पुनर्विकास करण्याचा निर्णय घेत रहिवाशांना दिलासा दिला.
पण हा निर्णय घेऊन आता ५ वर्षे झाली तरी पुनर्विकास प्रत्यक्षात मार्गी लागलेला नाही. पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी मोतीलाल नगरमधील रहिवासी मोतीलाल नगर विकास समितीच्या माध्यमातून म्हाडा आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं आहे. बुधवारी झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत पुनर्विकासासाठी प्रकल्प सल्लागार कंपनी म्हणून पी. के. दाससह अन्य एका कंपनीची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर २ महिन्यांत पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
१४२ एकर जागेचा पुनर्विकास करत ३,७०० रहिवाशांना टाॅवरमध्ये मोठी घरं दिली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे ५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या पुनर्विकासातून किमान १८ हजार घरे म्हाडाला विक्रीसाठी उपलब्ध होणार असून या घरांच्या विक्रीतून मुंबई मंडळाला अंदाजे २५ हजार कोटींचा महसूल मिळणार आहे.
हेही वाचा-
Good News! सिडकोच्या जमिनीची मालकी आता रहिवाशांकडे
आता प्रतीक्षा जून-जुलैची! मुंबईमधील अंदाजे २००० घरांसाठी लाॅटरी