नवी मुंबईसह पनवेल महापालिका क्षेत्रातील वीजग्राहकांना महावितरण कंपनीने तब्बल ४ पट वाढीव वीजबिल पाठवलं आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा झटका बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेली बेरोजगारी आणि त्यात भरीला अव्वाच्या सव्वा वीजबील यामुळे नवी मुंबईतील रहिवाशी संतप्त झाले आहेत. महावितरणाच्या या मनमानी कारभाराचा रहिवाशांनी तीव्र निषेध केला आहे.
नवी मुंबईसह पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली येथील रहिवाशांना चालू महिन्यात भरमसाठ वीजबिले वितरित करण्यात आलेली आहेत. ही बिले मीटरची रिडींग न घेता सरासरी काढण्यात आले असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. तिप्पट, चौपट वीजबिले आली असल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोरोनामुळे मागील तीन महिने लॉकडाऊन आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक मध्यमवर्गीयांचा पगारही झालेला नाही. अशा बिकट परिस्थितीत महावितरणने ३ महिन्याचे एकत्रित २५ हजार रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बिले वितरित केली आहेत. दुकाने, कंपन्या बंद असूनही त्यांना सरासरी बिलाच्या नावाखाली अवाढव्य बिलं पाठवली आहेत.
वाढीव बिलाची रक्कम कमी करणे, बिलाची रक्कम भरण्यास मुदतवाढ व हप्त्याने भरण्याची मुभा मिळण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी एम.एस.ई.डी.सी.एल.चे वाशी विभाग कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी ग्राहकांना वितरीत करण्यात आलेले विजेचे बिल कमी करणे, संचारबंदी लागू असल्याने बिल भरण्यास मुदतवाढ देणे, बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने ग्राहकांना हप्त्या-हप्त्याने बिले भरण्याची मुभा देणे, चुकीच्या रीडिंगने होत असणारी बिलाची छपाई, नादुरुस्त वीज मीटर, जलदगतीने चालणारे वीज मीटर बदली करणे अशा मागण्या करण्यात आल्या.
३ महिन्याचे एकत्रित बिल न देता रीडिंग घेऊन नियमाप्रमाणे प्रति महिन्याचे बिल देण्यात यावे. तसेच त्यावरील येणारे दंड,व्याज व अधिभार हे माफ करून एकूण येणारे बिल हे २४ हप्त्यांमध्ये वर्ग करून आकारण्यात यावे, अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली. तसेच सदर मागण्या त्वरित मान्य न झाल्यास भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी
३० मिनिटात कोरोनाचं निदान, पालिकेचं 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग'