सांताक्रूझ कोळे कल्याण येथील 'ओम नमो सुजलाम सुफलाम सोसायटी' ( झोपडपट्टी) च्या पुनर्विकासासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणा (एसआरए) ला बिल्डर मिळेनासा झाला आहे. 'एसआरए'कडून एखाद्या पुनर्विकास प्रकल्पासाठी पहिल्यांदाच बिल्डर नेमण्यात येत आहे. मात्र निविदा प्रक्रियेतील २०० कोटीच्या बँक गॅरंटीच्या अटीमुळे या प्रकल्पासाठी एकही बिल्डर येत नव्हता. अखेर 'एसआरए'ने बँक गॅरंटीची रक्कम घटवून २० कोटी करत तिसऱ्यांदा निविदा काढली आहे. त्यामुळे आता तरी या प्रकल्पाला बिल्डर मिळेल का? आणि १५ वर्षे रखडलेला प्रकल्प मार्गी लागेल का? याकडेच रहिवाशांचं लक्ष लागलं आहे.
या झोपडपट्टीमध्ये ८५२ झोपडीधारक असून या झोपडपट्टीचा पुनर्विकास गेल्या १५ वर्षांपासून रखडला आहे. दोन बिल्डरच्या वादात रखडलेला हा प्रकल्प चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. हा वाद उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. दोन बिल्डरच्या वादात अडकलेला प्रकल्प मार्गी लावावा अशी रहिवाशांची मागणी होती. त्यासाठीच ते न्यायालयात गेले होते. दरम्यान न्यायालयाने जानेवारी २१८ मध्ये या दोन्ही बिल्डरांना बाजूला सारत 'एसआरए'ने निविदा काढून बिल्डर नेमावा, असे आदेश दिले. त्यासाठी बिल्डरकडून २०० कोटी बँक गॅरंटी घेण्याचेही आदेश दिले होते.
या आदेशानुसार 'एसआरए'ने निविदा काढली. पण या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही. त्यातच मार्च २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा प्रकल्प 'एसआरए'नेच बिल्डर नेमत मार्गी लावावा असे अंतिम आदेश दिले. या आदेशानंतर दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. पण दुसऱ्या निविदेलाही प्रतिसाद मिळाला नाही.
२०० कोटींच्या हमी मुळे बिल्डर पुढे येत नसल्याचं स्पष्ट झाल्याने 'एसआरए'ने ही सर्व वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडत २०० कोटीची हमी कमी करण्याची परवानगी घेतली. या परवानगीनुसार काही दिवसांपूर्वीच तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्याची माहिती 'एसआरए'तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
तर यावेळी नक्की बिल्डर मिळेल नि प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास ही व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे हा विश्वास खरा ठरतो का नि पुनर्विकास मार्गी लागतो की निविदा खुल्या झाल्यानंतर अर्थात ३० सप्टेंबरनंतरच कळेल.
हेही वाचा-
झोपडपट्टीवासीयांना आता 'आसरा'चा आसरा!
Exclusive: सिडकोचं घर अडीच लाखांनी स्वस्त मिळणार!