आल्हाददायक वातावरण आणि समुद्र किनारी भोजनासोबत मद्य प्राशन करण्याचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येक जण गोव्याला जाणं पंसत करतात. पण मुंबईच्या बीचवरच ही मजा लुटायला मिळाली तर??? हे वाचून विश्वास बसला नसेल ना? पण आता मुंबईतही हे शक्य होणार आहे.
कारण, राज्य सरकारने राज्यातील ७२० किमी अंतराच्या समुद्र किनाऱ्यांना पर्यटनस्थळाचं स्वरुप देण्यासाठी एक नवीन धोरण आणलं आहे. हे धोरण लागू होताच गोव्याप्रमाणे राज्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर 'सी फूड'चा आस्वाद घेत दारूही पिता येणार आहे. हुक्का ओढण्यासाठी मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. यासाठी राज्य सरकार विशेष व्यवस्था करणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आधी समुद्री किनारी दारू विक्रीबाबत राज्य सरकार द्विधा मनस्थितीत होते. पण अबकारी विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. परवानगीनंतर बीचवर दारू विक्री सुरू झाल्यानंतर राज्य सरकार कठोर व्यवस्था देखील करणार आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकार बीचवर सीसीटीव्ही लावणार असून एक विशेष पथक देखील नेेमणार आहे. येथे अनधिकृतरित्या दारू विक्री करणाऱ्यांचे परवाने रद्द करणे, सीसीटीव्हीची निगराणी करण्याची जबाबदारी पथकात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची राहणार आहे. याचसोबत कोणत्याही परदेशी नागरिकाला या समुद्र किनारी असलेल्या स्टॉलवर काम करण्याची परवानगी नसेल.
हे स्टॉल सकाळी ७.३० वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहतील. याचसोबत रात्री १० वाजेनंतर मोठ्या आवाजात वाजणाऱ्या संगीताला परवानगी नसेल. हे स्टॉल सप्टेंबरपासूत ते मे पर्यंत सुरू राहतील.
हेही वाचा -
'मरिन ड्राइव्ह'च्या जागतिक वारशाला रहिवाशांचा विरोध