मातृत्वाचा सत्कार करण्यासाठी शनिवारी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मातांसाठी 'मम्मा मीया' या फॅशन शो आणि रॅम्पवॉक स्पर्धेचाही समावेश होता. या स्पर्धेनिमित्त रॅम्पवर चालून मातांनी आपल्या अनोख्या अदांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
'मॉम्स ऑफ इंडिया' या संघटनेच्या वतीने खास मातांसाठी 'मम्मा मीया' हा फॅशन शो तसेच रॅम्प वॉक आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोला 'बिग बॉस' फेम मनू पंजाबी तसेच मिसेस आशिया तन्वी तुषार सावंत यांची खास उपस्थिती होती. स्पर्धेत मुंबईच्या भारती शर्मा यांनी 'वर्ल्ड बेस्ट मॉम' चा किताब पटकाविला. या कार्यक्रमात तीनशेहून अधिक महिलांनी भाग घेतला होता.
याचप्रमाणे रुग्णालयात ताणतणावमुक्ती शिबीर तसेच गर्भारपणातील समस्यांवर कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती.
स्त्री रोग तज्ज्ञ डॉ गंधाली देवरुखकर यांनी शहरातील महिलांना गर्भारपणात होणारे त्रास व त्यावरील उपाय यावर कार्यशाळा घेतली. तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नूतन लोहिया यांनी घर व नोकरी सांभाळताना महिलांना येणारा मानसिक ताणतणाव कसा दूर होईल, यावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमासंदर्भात वोक्हार्ट रुग्णालयाचे केंद्र प्रमुख डॉ. पराग रिंधानी म्हणाले की, मातृत्वाचा सन्मान हा रोजच झाला पाहिजे, आई मग ती कालची असो की उद्याची असो. तिचा योग्य तो आदर राखणं ही काळाची गरज आहे. तिच्यायोगे आपण दुनिया पाहू शकलो, याचं जागतं भान ठेऊन तिच्या आईपणाचा उदो उदो करणं हेच आपलं कर्तव्य आहे.