Advertisement

आशयघन स्वप्नांचा अर्धवट प्रवास

प्रथमच दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या संतोष मिजगर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून, दिग्दर्शनासोबतच मुख्य भूमिकाही साकारली आहे. पाटील हा गावचा भक्षक नसून रक्षक असतो, खलनायक नसून नायक असतो हा विचारही या चित्रपटाच्या माध्यमातून मिजगर यांनी दिला आहे. याशिवाय मैत्रीचा एक सुरेखा धागाही या चित्रपटाच्या कथेत गुंफण्यात आलेला आहे. पण हे सर्व मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला नाही.

आशयघन स्वप्नांचा अर्धवट प्रवास
SHARES

काही चित्रपट चांगले विचार देतात, पण सादरकरणातील उणिवा किंवा अभिनय-दिग्दर्शनातील त्रुटींमुळे ते विचार प्रभावीपणे पडद्यावर सादर होत नाहीत. ‘पाटील’ या चित्रपटाबाबतही तेच झालं आहे. आई-वडील आपल्या मुलांसाठी स्वप्न पाहतात. मुलं ती स्वप्नं साकार करण्यासाठी सुरुवातीला प्रयत्नही करतात, पण जेव्हा त्यांच्या आयुष्यात प्रेमाची चाहूल लागते, तेव्हा मुलं आई-वडिलांच्या स्वप्नांकडे पाठ फिरवून प्रेमालाच अधिक महत्त्व देतात. अशा परिस्थितीत मुलांनी काय करायला हवं? याचं उत्तर या चित्रपटात देण्यात आलं आहे.


मनोरंजकमूल्यांचा अभाव

प्रथमच दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या संतोष मिजगर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून, दिग्दर्शनासोबतच मुख्य भूमिकाही साकारली आहे. पाटील हा गावचा भक्षक नसून रक्षक असतो, खलनायक नसून नायक असतो हा विचारही या चित्रपटाच्या माध्यमातून मिजगर यांनी दिला आहे. याशिवाय मैत्रीचा एक सुरेखा धागाही या चित्रपटाच्या कथेत गुंफण्यात आलेला आहे. पण हे सर्व मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला नाही. या चित्रपटात भाषणबाजी नसली तरी मनोरंजकमूल्यांचा अभावही तितक्याच प्रकर्षाने जाणवतो.


काय आहे कथा?

बापूराव पाटील (शिवाजी लोटण पाटील) यांचा मुलगा शिवाजी (संतोष मिजगर) याने पाहिलेल्या स्वप्नांचा हा प्रवास आहे. तहसिलदार कार्यालयात क्लार्क म्हणून काम करणाऱ्या शिवाजीला आपल्या मुलाला इंजिनीयर बनवायचं आहे. याच कार्यालयात त्याचा बालपणीचा मित्र भिमा वाघमारे (सुरेश पिल्ले) अधिकारी या पदावर आहे. हालाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या भिमाला बापूराव म्हणजेच शिवाजीच्या वडिलांनीच शिक्षणासाठी मदत केलेली असते. त्यामुळे अधिकारी आणि क्लार्क असूनही दोघांची अतूट मैत्री असते.

भिमाच्या मदतीने शिवाजी आपला मुलगा कृष्णाला (नरेंद्र देशमुख) इंजिनियरींग काॅलेजमध्ये दाखल करतो. भिमाची मुलगी पुष्पादेखील (भाग्यश्री मोटे) त्याच काॅलेजमध्ये असते. दोघे एकमेकांना बालपणापासूनच ओळखत असल्याने त्यांचं प्रेम होतं. पुष्पाचा भाऊ सम्राट (कपिल गुडसूरकर) याला हे मान्य नसतं. कृष्णा आणि पुष्पा लग्न करण्यासाठी घरून पळून जातात, पण सम्राट दोघांना पकडतो आणि कृष्णाला बेदम मारतो. त्यानंतर हे प्रेम प्रकरणाचं काय होतं? आणि कथानक कोणतं वळण घेतं? ते पुढे पाहायला मिळतं.


विस्कळीत पटकथा

चित्रपटाच्या कथेत मांडलेले काही विचार खूपच चांगले असून, तरुणाईसाठी मार्गदर्शक आहेत. यातील मैत्रीचा ट्रॅकही सुरेख आहे, पण या सर्वांना एकाच धाग्यात गुंफणारी पटकथा आणखी विस्कळीत वाटते. संवादही तितकेसे प्रभावी नाहीत. चित्रपट सुरू झाल्यानंर कथानक मंद गतीने पुढे सरकतं. बराच वेळ एकाच मुद्द्यावर रेंगाळत राहतं. कृष्णा-पुष्पा यांचं पळून जाणं आणि पुन्हा पकडलं जाणं खूपच बालिशपणाचं वाटतं. झी वाहिनीला खूश करण्यासाठी चित्रपटात समाविष्ट केलेलं डाॅ. सुभाषचंद्र यांचं व्याख्यान खूप लांबल्याने कंटाळवाणं वाटतं. एकेकाळी गावचा पाटील असलेल्या शिवाजीच्या कुटुंबियांना गावकरी नको नको ते बोलतात तरीही तो प्रत्युत्तर देण्याऐवजी गप्पच राहतो.


गंभीर मुद्द्यांवर प्रकाश

या चित्रपटाच्या निमित्ताने काही गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी अनुभवहिनतेमुळे कोणताही मुद्दा प्रभावीपणे पडद्यावर पाहायला मिळत नाही. मध्यंतरापूर्वीची कथा यापूर्वी एखाद्या गाजलेल्या चित्रपटाच्या धर्तीवर असल्यासारखी वाटते. मध्यंतरानंतर मात्र अपेक्षेपेक्षा वेगळं कथानक पाहायला मिळत असलं तरी तोपर्यंत चित्रपट पाहण्याचा उत्साह मावळलेला असतो.

गीत-संगीत डोक्याची शीर उठवणारं आहे. कथेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या या गाण्यांच्या चाली यापूर्वी कुठेतरी ऐकल्यासारख्या वाटतात. कॅमेरावर्क चांगलं आहे. संकलनात चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावून चित्रपटाची लांबी कमी करण्याची गरज होती.


अभिनयात निराशा

शीर्षक भूमिकेत स्वत:ला सादर करण्याचा अट्टाहास संतोष मिजगर यांनी टाळण्याची गरज होती. त्यांच्या ठिकाणी एखादा तगडा अभिनेता असता तरी बराच फरक पडला असता. शिवाजी लोटण पाटील यांनी आपल्या छोट्याशा भूमिकेलाही अचूक न्याय दिला आहे. कृष्णाच्या भूमिकेत नरेंद्र देशमुख निराश करतो. त्याच्या अभिनयात कुठेही पाटीलकीचा बाणा दिसत नाही.

या तुलनेत भाग्यश्री मोटेने त्याच्या प्रेयेसीची भूमिका विचारपूर्वक, तसंच अभिनय आणि संवादांची अचूक सांगड घालत साकारली आहे. सुरेश पिल्ले यांनी साकारलेला भिमाही स्मरणात राहतो. कपिल गुडसूरकरने वठवलेला खलनायक भारी वाटतो. थोडक्यात काय तर मिजगर यांनी स्वत:सोबतच आपल्या नात्यागोत्यातील, ओळखीच्या व्यक्तींना तसंच मित्रमंडळींना कलाकाराच्या रूपात सादर केल्याने अभिनयाची पाटी बऱ्याच अंशी कोरीच राहिली आहे.

निर्मिती तसंच मनोरंजकमूल्यांचा अभाव, काही अनोळखी कलाकारांचा अपेक्षाभंग करणारा अभिनय आणि तांत्रिकदृष्ट्या दुर्बल असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी स्वत:च्या हिमतीवर पाहायला हरकत नाही.

दर्जा : **  

................................................

चित्रपट: पाटील
निर्माते: तेजल शहा, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक

कथा, पटकथा आणि दिग्दर्शन: संतोष मिजगर

कलाकार: संतोष मिजगर, शिवाजी लोटण पाटील, नरेंद्र देशमुख, सुरेश पिल्ले, भाग्यश्री मोटे, कपिल गुडसूरकर, प्रतिमा देशपांडे, पूजा सरंजीने, अभिलाषा पाटील, वर्षा दांदळे, डॉ जगदीश पाटील, सुधाकर बिराजदार



हेही वाचा-

आवाक्याबाहेर गेलेला अगड'बम’!

‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा