२०१७ हे वर्ष कसं पटकन सरलं! या वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत खूप काही घडामोडी घडल्या नाहीत. मात्र अनेक मराठी नायक-नायिका लग्नबंधनात अडकले. कुणी डेस्टिशन वेडिंग केले, तर कुणी साध्या पध्दतीने लग्न करायला पसंती दिली. कुणी लव्ह मॅरेज केले, तर कुणी घरच्यांच्या पसंतीने लग्न केले.
'लव्ह लग्न लोचा' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षया गुरवने सिनेमॅटोग्राफर भूषण वाणी याच्याशी लग्न केलं. २३ नोव्हेंबर २०१७ ला ते लग्नबंधनात अडकले. एका मित्राच्या माध्यमातून अक्षया आणि भूषणची ओळख झाली. अक्षया आणि भूषणचा प्रेमविवाह आहे. सेम इंडस्ट्रीमधला मुलगा असल्यामुळे अक्षया घरून परवानगी मिळवायला थोडी वाट बघावी लागली.
अमेय वाघ आणि साजिरी देशपांडे यांचा विवाह समारंभ २ जुलैला पार पडला. अमेय आणि साजिरी हे गेली १३ वर्ष एकमेकांना डेट करत होते. या विवाह सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. पुण्यातील श्रृतीमंगल कार्यालयात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी 'मुरांबा', 'फास्टर फेणे' या चित्रपटातील कलाकार अमेयच्या लग्नात उपस्थित होते.
१७ मार्चला अभिनेत्री मनवा नाईकने निर्माता सुशांत तुंगारे याच्याशी विवाह केला. तिने आणि सुशांतने 'चूकभूल द्यावीघ्यावी' या मलिकेची निर्मिती केली आहे. तर कलर्स मराठीवरील सरस्वती या मालिकेची निर्मितीही सुशांतची आहे. मनवाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं. तिच्या लग्नाला मोजकेच मराठी कलाकार उपस्थित होते.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून लेखन आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा पांडू म्हणजेच प्रल्हाद कुडतरकर याने अंजली कानडेशी लग्न केलं आहे. मे महिन्यात त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. अंजली ही योग प्रशिक्षक आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेबरोबरच प्रल्हादने 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' या मालिकेचं लेखनही केलं आहे. सध्या प्रल्हादची 'गाव गाता गजाली' ही मालिका लोकप्रिय ठरत आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे १४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकली. निर्माता, दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्यासोबत प्रार्थनाने विवाह केला. प्रार्थनाने गोव्यामध्ये आपले डेस्टिनेशन वेडिंग केले. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी केलेली धम्माल, मस्ती कलाकारांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. त्याचे काही सुंदर फोटो त्यांनी सोशल साईटवर शेअर केले आहेत.
रोहन गुजर याने २१ नोव्हेंबरला आपले लग्न अतिशय साध्या पद्धतीने केले आहे. केवळ १५ व्यक्तींच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. रोहनने आपली मैत्रीण स्नेहल देशमुख हिच्याशी विवाह केला. दोघांचे आईबाबा आणि जवळचे नातेवाईक या लग्नाला उपस्थित होते. 'होणार सून मी' या मालिकेतून रोहन गुजर घराघरात पोहोचला.
'रेगे' चित्रपटातून प्रसिद्ध झालेला अभिनेता आरोह वेलणकर ११ डिसेंबरला विवाह बंधनात अडकला आहे. आरोहने आपली कॉलेजमधली मैत्रिण अंकिता शिंगवी हिच्याशी महाबळेश्वरमध्ये लग्न केलं आहे. अंकिता ही उत्तम नृत्यांगना आहे.
काही दिवसांपूर्वी आरोहने अंकिता आणि त्याचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड करून आपण लग्न करत असल्याची खूष खबर चाहत्यांना दिली होती. त्याचबरोबर आरोहचे प्री-वेडिंग शूटही बरंच चर्चेत राहिलं.
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत १३ डिसेंबरला विवाहबंधनात अडकला आहे. 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' अस म्हणत अभिनयने प्रेक्षकांच्या मनात अपलं स्थान निर्माण केलं आहे. अभिनय त्याची मैत्रीण पूर्वा पंडीत हिच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अभिनय सावंतच्या लग्नाला अनेक मराठी सेलेब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेत्री प्राजक्ता माऴी हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. 'आज मेरे भाई की शादी है' असं सुंदर कॅप्शनही तिने त्या सुंदर फोटोला दिलं आहे.