दादरचं शिवाजी पार्क मैदान अनेक ऐतिहासिक गोष्टींची साक्ष देतं. अनेक स्थित्यंतरं आली, सत्तांतरं झाली त्यात शिवाजी पार्कच्या आजूबाजूचं वातावरण, भवताल बदलला तरी तिथली लाल माती आजही काही ऐतिहासिक गोष्टींची साक्षीदार आहे. हाच इतिहास आता ‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुन्हा लोकांसमोर येत आहे.
शिवाजी पार्क आणि तिथल्या दसरा मेळाव्याची दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची सभा सर्वांनाच ठाऊक आहे. मराठी बाणा आणि करारी आवाजाची धडधडती तोफ ‘हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘मी शिवाजी पार्क’ असं म्हणत या सिनेमाचं प्रमोशन सुरू करण्यात आलं आहे. या टीझर पोस्टरवर असंख्य जनसमुदायाला संबोधित करणारा बाळासाहेबांचा ३० आॅक्टोबर १९६६ मधील ब्लॅक अँड व्हाईट फोटोही शेअर करण्यात आला आहे.
प्रमोशनची ही कल्पना सुरेख असल्याचं काहींचं म्हणणं अाहे. जुनं ते सोनं म्हणत प्रमोशनसाठी वर्तमानपत्रांमधील जागा विकत घेण्याऐवजी अशा प्रकारच्या जाहिरातबाजीमधून कल्पकतेचं दर्शन घडत असल्याचं म्हणत काहींनी या पोस्टरचं आणि त्यामागील संकल्पनेचं कौतुक केलं आहे. गौरी पिक्चर्स प्रॅाडक्शन आणि महेश मांजरेकर मुव्हीजची निर्मिती असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ हा सिनेमा १८ आॅक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘न्यायदेवता आंधळी असते... आम्ही डोळस होतो’ ही टॅगलाईन ‘मी शिवाजी पार्क’बाबत उत्सुकता वाढवणारी आहे. महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाची निर्मिती दिलीप साहेबराव यादव आणि सिद्धर्थ केवलचंद जैन यांनी केली आहे. विक्रम गोखले, सतिश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम आणि दिलीप प्रभावळकर या ज्येष्ठ अभिनेत्यांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाची सहनिर्मिती मंगेश जगताप, शंकर मिटकरी, भरत राठोड, मिलिंद वस्ते यांनी केली आहे.
हेही वाचा -
सलमान सोसायटी’मध्ये नम्रता आवटेची ‘पार्टी’
गिरीश कुलकर्णीचा ‘तोडफोड...’ अंदाज!