सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेत असलेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट आता मराठीतून प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगणारा हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होत असल्यानं अनेकांनी मराठीतून या चित्रपटाचं प्रदर्शन व्हावं अशी मागणी केली होती. त्यानुसार, आता लवकरचं या चाहत्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची हिंदीप्रमाणेच मराठीत देखील निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ही हा चित्रपट मराठी डब करण्यासाठी पाठिंबा दर्शविला होता. त्यातच आता हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित होणार असून लवकरच त्याचा मराठी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
#Announcement: #Tanhaji: #TheUnsungWarrior will also release in #Marathi version on 10 Jan 2020 across #Maharashtra... #Marathi trailer will be out on 10 Dec 2019... Stars #AjayDevgn, #Kajol and #SaifAliKhan... Directed by Om Raut... 10 Jan 2020 release. #TanhajiTheUnsungWarrior pic.twitter.com/jY5BG8ekUY
— taran adarsh (@taran_adarsh) 6 December 2019
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटवर एक पोस्ट करत ‘तान्हाजी’ हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं. त्यासोबतच १० डिसेंबर २०१९ रोजी त्याचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळं सध्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. या चित्रपटात शरद केळकर (छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत), देवदत्त नागे (सूर्याजी मालुसरे), शशांक शेंडे (शेलारमामा) या मराठी कलाकारांच्या भूमिका साकारणार आहेत.
सध्या ‘पानिपत’ आणि ‘तान्हाजी’ हे २ मोठे ऐतिहासिक चित्रपट चर्चेत येत आहेत. या दोन्ही चित्रपटांमधून मराठ्यांचा इतिहास उलगडला जाणार आहे. त्यामुळं साऱ्यांचं लक्ष या चित्रपटांकडं लागलं आहे. ‘तान्हाजी’मधून शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील 'तानाजी मालुसरे' या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगण्यात येणार आहे. यामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, काजोल यांसोबतच बरेच कलाकार भूमिका साकारत आहेत.
हेही वाचा -
मुंबईसाठी ‘व्हिजन २०३०’चं लक्ष्य, मुख्यमंत्र्यांनी दिली महापालिकेला भेट
म्हाडा कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ