महाराष्ट्रात महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा सर्वच पक्ष व आघाड्यांकडून जागावाटप व उमेदवार निश्चितीची प्रक्रिया पार पाडली जात आहे. अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यातून त्यांच्या मालमत्तेबाबतचा तपशील समोर आला आहे.
आदित्य ठाकरेंची मालमत्ता किती?
2019 साली पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांपूर्वी वैयक्तिक एकूण मालमत्ता 17 कोटी 69 लाख रुपये होती. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण वैयक्तिक मालमत्ता 23 कोटी 43 लाख इतकी आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता 6 कोटी 4 लाखांची आहे. तर जंगम मालमत्ता 17 कोटी 39 लाख इतकी आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी गेल्या 5 वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीमध्ये 6 कोटींची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी विधि शाखेची पदवी घेतल्याचंही प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.
एकूण मालमत्ता – 23 कोटी 43 लाख (2019 मध्ये 17 कोटी 69 लाख)
स्थावर – 6 कोटी 4 लाख
जंगम – 17 कोटी 39 लाख
गुन्हे नोंद – जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल
शिक्षण – विधि शाखेची पदवी
आदित्य ठाकरेंवर एक गुन्हा
आदित्य ठाकरेंनीदेखील त्यांच्यावर दाखल गुन्ह्याचा तपशील प्रतिज्ञापत्रात दिला आहे. त्यानुसार, आदित्य ठाकरेंवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. त्यासंदर्भात त्यांचा पोलीस स्थानकाच्या नोंदींमध्ये उल्लेख आहे.
हेही वाचा