चर्चगेट - सैनिकांचा आणि त्यांच्या पत्नींचा अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांची आमदारकी कायमची रद्द करावी अशी मागणी भारतीय नवजवान सेना या माजी सैनिकांच्या संघटनेने केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय चर्चगेट येथील ओव्हल मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची माहिती सेनेचे कार्यकर्ते डी. एफ. निंबाळकर यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली.
या उपोषणात राज्याच्या कानाकोपऱ्यातले माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय जमा होणार आहेत. तसेच जोपर्यंत परिचारक यांची आमदारकी कायमची रद्द होत नाही आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अभिनेते नाना पाटेकर आणि अक्षय कुमारही हजेरी लाऊन माजी सैनिकांना पाठिंबा देणार आहेत.