भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उत आला. या दोघांमध्ये साधारणत: अर्धा तास चर्चा झाली. परंतु या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
एकनाथ खडसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते. परंतु लोकसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर चर्चा असल्याने ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा- शिवसेनेची भाजपला साथ, केलं नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान
त्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, महाराष्ट्रात पक्ष उभारणीसाठी मी कष्ट घेतले. परंतु राज्यात जेव्हा भाजपची सत्ता आली, तेव्हा पक्षनेतृत्वाकडून मला सातत्याने डावलण्यात आलं. माझ्यावर असंख्य खोटे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे मला मंत्रीमंडळातून काढण्यात आलं. चाैकशीतून मी निर्दोषत्व सिद्ध करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही. भाजपच्या कोअर कमिटीतून मला बाहेर काढण्यात आलं. माझं तिकीट कापलं. निवडणुकीत आपल्याच पक्षातील नेत्यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला. ही सगळी बाब मी पक्षातील वरिष्ठांच्या कानावर घातली आहे. माझा पक्ष सोडण्याचा विचार नाही. परंतु माझ्यावर सातत्याने अन्याय होत असेल, तर वेगळा विचार करावा लागेल.
भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याचा आरोपही खडसे यांनी आधी केला होता. एकप्रकारे दरम्यान पंकजा मुंडे यांची भाजपच्या विभागीय बैठकीला गैरहजेरी आणि प्रकाश मेहता यांनी मुंडे यांची घेतलेली भेट यावरून फडणवीस यांच्याविरोधात नाराज नेेते एकवटत असल्याचं दिसून येत आहे.