कथित राम मंदिर जमीन घोटाळ्याच्या वृत्तानंतर शिवसेनेकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे. पाठोपाठ काँग्रेसनेही हा मुद्दा उचलून धरत भाजपवर टीकास्त्र डागण्यास सुरूवात केली आहे. यावरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसकडून (congress) सुपारी घेऊनच शिवसेना शंका उपस्थित करत असल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर यांचं म्हणणं आहे.
सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे.
ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!
शिवसेनेच्या (shiv sena) वक्तव्यामगील मागील प्रेरणा... राम मंदिराला कसून विरोध करणारे आता मंदिर निर्मितीत कोलदांडा घालतायत. अस्तनीतल्या निखाऱ्यांच्या मदतीने…, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
हेही वाचा- राम जन्मभूमी जमीन घोटाळा?, शिवसेनेची चौकशीची मागणी
शिवसेनेच्या वक्तव्यामगील मागील प्रेरणा... राम मंदिराला कसून विरोध करणारे आता मंदिर निर्मितीत कोलदांडा घालतायत. अस्तनीतल्या निखाऱ्यांच्या मदतीने... pic.twitter.com/Uydqzv9CHF
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 14, 2021
दरम्यान शिवसेनेने सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आप’ पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. फक्त १० मिनिटांपूर्वी २ कोटींना घेतलेली जमीन राममंदिर निर्माण न्यासाने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे.
अयोध्येतील राममंदिर उभारणीचं काम व त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असं काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचं संशयास्पद प्रकरण समोर आलं. ते खरं की खोटं याचा लगेच खुलासा झाला तर बरं! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचं कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणं गरजेचं आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभं राहिलं. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.