भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं जुहू इथलं निवासस्थान “अधिश” या बंगल्याची पाहणी करण्याकरता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी येणार असल्याची माहिती आहे.
त्या संदर्भातली नोटीस देखील नारायण राणे यांना पाठवलेली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी देखील नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी केली होती.
जुहू चौपाटीवर अगदी हाकेच्या अंतरावरती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हा बंगला आहे. यापूर्वी देखील काही अधिकाऱ्यांकडून या बंगल्याची पाहणी करण्यात आली होती. या बंगल्याच्या बांधकामांमध्ये सीआरझेड नियमांचं उल्लंघन, अनधिकृत बांधकाम आणि FSI चा वाढीव उपयोग केला गेला आहे, असे काही आरोप लावण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर आरोप केले होते याच संदर्भात त्यांच्या बंगल्याला ही पालिकेची नोटीस दिली गेली आहे का? अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.
किरीट सोमय्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या कोर्लई येथील जागेवर जाऊन १९ बंगले अस्तित्वात आहेत की नाहीत याची पाहणी करणार आहेत.
हेही वाचा