भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक २०१९ च्या वेळी सोशल मीडियाचं काम एका भाजपच्या पदाधिकाऱ्याला देणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकाराची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीशी संबंधित अनेक आरोप केले. (congress mla prithviraj chavan raises question on ec over hiring bjp linked agency for media promotion during maharashtra assembly election)
कंत्राट कसं मिळालं?
या पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडून सोशल मीडियावर मतदार जागृतीसाठी जाहिराती पोस्ट करण्यात येत होत्या. या जाहिरातीचं काम साइनपोस्ट इंडिया नावाच्या खासगी कंपनीला देण्यात आलं होतं. तर सोशल सेंट्रल ही या कंपनीची उपकंपनी आहे. या दोन्ही कंपन्या भाजप युवा मोर्चाच्या आयटी सेलचे राष्ट्रीय संयोजक देवांग दवे यांच्या आहेत. याचाच अर्थ या कंपनीकडून एकाचवेळी निवडणूक आयोग आणि भाजपच्या सोशल मीडियाचं काम हाताळण्यात येत होतं. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून या कंपनीला निवडणूक आयोगाच्या कामाचं कंत्राट कसं मिळालं? कंपनीला कंत्राट देण्यासाठी राजकीय दबाव होता का?, असे प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आयटी सेलचा वापर? निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
पत्ता एकच
विधानसभा निवडणुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुक पेज सुरु केलं होतं. हे पेज तयार करताना "२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई". हा पत्ता देण्यात आला होता. शोध घेतला असता हा पत्ता फडणवीस सरकारच्या काळात जाहिरातीचं काम करणाऱ्या “साईनपोस्ट इंडिया’ नावाच्या कंपनीचा निघाला. हाच पत्ता ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीने देखील वापरला आहे. ही कंपनी देवांग दवे यांच्या नावावर आहे. देवांग दवे ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदी' इत्यादी पेजेसचे फाउंडर असून या पेजवरून भाजपाचा प्रचार आणि विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल द्वेष पसरवण्यात येतो, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
दोषींवर कारवाई
प्रसिद्धीचं काम करणाऱ्या कंपनीला सगळी माहिती द्यावी लागते. लोकशाही व्यवस्थेत निवडणुका या निष्पक्ष वातावरणात होणं आवश्यक असतं. परंतु हा सगळा प्रकार एखाद्या पक्षाला मदत करण्याचाच हेतूने झालेला दिसतो. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करायला हवी. तसंच दोषींवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
हेही वाचा - 'जय भवानी, जय शिवाजी' रेकॉर्डवरून काढणं चुकीचं- नाना पटोले