राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल अंमलबजावणी संचलनालया (ईडी)ने एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. यामुळे पटेल यांच्यापुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
या आधी त्यांना १ जून रोजी समन्स बजावून ६ जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे आपल्याला चौकशीसाठी हजर राहता येणार नाही, असं कारण देत त्यांनी ‘ईडी’ पुढं येणं टाळलं होतं. त्यामुळे ईडीने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावत १० किंवा ११ जून रोजी हजर रहाण्यासंबंधी समन्स बजावलं आहे.
पटेल यांचा मित्र तसंच उद्योग सल्लागार दीपक तलवार याच्यावर यूपीए सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरून विशिष्ट विमान कंपन्यांना झुकते माप देत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग ३ आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिल्याचा आरोप आहे. या मोबदल्यात त्याला २००८- ०९ दरम्यान २७२ कोटी रुपये मिळाल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता.
एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, आर्थिक स्थिती नसताना ७०,००० कोटी रुपये किमतीच्या १११ विमानांची खरेदी, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे, असे आरोप दीपकवर आहेत. या अंतर्गत त्याच्यावर ५ गंभीर गुन्ह्याची नोंद असून तो सध्या तुरूंगात आहे. याप्रकरणी पटेल यांची चौकशी होणार आहे.
हेही वाचा-
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचं समन्स, एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी
मनसे मोदींना पाठवणार १० हजार पोस्ट कार्ड, मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आक्रमक