महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबतचा संभ्रम फक्त प्रसारमाध्यमांच्या मनात आहेत. लवकरच शिवसेनेचं सरकार येणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजून घेण्यासाठी पुढचे १०० जन्म घ्यावे लागतील, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.
हेही वाचा- पुढच्या २ दिवसांत सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय- नवाब मलिक
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबतचा गोंधळ आणखी वाढला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास अजूनही तयार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर आता कुठले पर्याय उपलब्ध आहेत, याबद्दलही तर्कवितर्क लावले जात आहेत.
त्यावर बोलताना राऊत म्हणाले, सत्ता स्थापनेच्या बाबतीत शिवसेनेच्या मनात कुठलाही गोंधळ नसून हा गोंधळ फक्त प्रसारमाध्यमांच्या मनात आहे. राज्यातील जनतेला राष्ट्रपती राजवट लवकर हटवण्यात यावी, असं वाटत आहे. त्यामुळे ६ महिन्यांच्या आत जनतेला स्थिर सरकार द्यावं, यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिवसेना लवकरच सरकार स्थापन करणार असून त्यावेळी शिवसेनेकडे १७० चं संख्याबळ असेल.
हेही वाचा- राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक, सत्ता स्थापनेचा पेच सुटणार?
पवार यांच्याबद्दल संजय राऊत यांनी सांगितलं, की शरद पवार देशातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे सरकार स्थापन होताना मित्रपक्षांना विचारात घेण्यात काहीही अयोग्य नाही. शरद पवार यांना समजून घेण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील.
सरकार स्थापनेबद्दल बोलताना आशिष शेलार यांनी शहा आणि मोदी समजून घ्यायला १० जन्म घ्यावे लागतील, असं वक्तव्य केलं होतं. त्याला राऊत यांनी दिलेलं हे प्रत्युत्तर मानलं जात आहे.
हेही वाचा-
शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत अजून चर्चाच नाही, शरद पवारांनी वाढवला संभ्रम
'एनडीए'तून बाहेर काढणारे तुम्ही कोण? इतिहासाचे दाखले देत, सामनातून भाजपवर टीका