वरळी विधानसभा मतदारसंघ क्षेत्र मुंबईतील सर्वात पॉश भाग आहे. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येणारा हा विधानसभा मतदार संघ स्थानिक राजकीय कार्यक्रमांचे केंद्र म्हणूनही ओळखला जातो. या मतदारसंघातून काँग्रेस, सीपीएम, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आतापर्यंत विजय मिळवला आहे. सध्या शिवसेनेचे सुनील शिंदे येथून आमदार आहेत. याआधी ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. हा विधानसभा मतदारसंघ मोठ्या इमारती, अपार्टमेंटसाठी ओळखला जातो.
युवासेना प्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. प्रथमच ठाकरे कुटुंबातील कोणी व्यक्ती निवडणूक लढवत आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सचिन अहिर यांनी यावर्षी जुलैमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आदित्य वरळीतून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेने दिले. अहिर यांना पक्षात घेऊन आदित्यला कडवं आव्हान उभं राहणार नाही याची काळजी शिवसेनेने घेतली.
वरळी विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा मतदार संघ हाजी अली दर्गा, वरळी नाका, फिनिक्स मॉल, लोअर परेल पश्चिम, कामगार नगर, सिद्धार्थ नगर आणि कोळीवाडा येथे पसरलेला आहे. १९९० ते २००४ या काळात शिवसेनेचे दत्ताजी नलवडे यांनी चार वेळा येथून विजय मिळविला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत येथून शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांचा पराभव केला. सुनील शिंदे यांनी ६०,२४५ मते, अहिर यांनी ३७,६१३, भाजपाचे सुनील राणे यांना ३९,८४९ आणि मनसेचे विजय कुडतरकर यांनी ८४२३ मते मिळवली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांना ५२,३९८, शिवसेनेचे आशिष चेंबूरकर यांना ४७,१०४ आणि मनसेचे संजय जामदार यांना ३२,५४२ मते मिळाली.
वरळी परिसरातील रहदारी ही सर्वात मोठी समस्या आहे. यासह जुन्या चाळींचा पुनर्विकास हा देखील मोठा प्रश्न आहे. बीडीडी चाळीचे पुनर्वसन ही देखील परिसरातील मुख्य समस्या आहे. या मतदारसंघात एकूण २ लाख ६५ हजार ९१ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ४९ हजार ६७ पुरूष मतदार तर १ लाख १६ हजार २४ महिला मतदार आहेत.
हेही वाचा -
Maharashtra Assembly Election- दहिसर विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
Maharashtra Assembly Election – मालाड पश्चिम मतदारसंघातून कोण येणार निवडूण?