कोविड महामारीचं संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही, असा संदेश जगभरात गेला आहे. भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता, पण मोदींच्या अहंकारी, मनमानी तसंच नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की झाली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी कोरोना संकट तसंच लसीकरणाबाबत मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या जिवाचं रक्षण करण्यात अपयशी ठरले असून सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स स्थापन करून त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं आकलन करुन मोदी सरकारने नियोजन केलं नाही. त्यामुळे हजारो लोकं ऑक्सिजन, योग्य आरोग्य उपकरणे, पुरेशा लसींअभावी मरत आहेत. शेकडो मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने क्रूरपणे दफन केली जात आहेत, तर शेकडो नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत.
लस नाही, औषध नाही, ऑक्सिजन नाही, पीएम केअरमधून पुरवलेली उपकरणेही दुय्यम दर्जाची आहेत. मोदींचं आपत्ती धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन किती पोकळ आहे, याची जागतिक प्रसारमाध्यमांनी पोलखोल केली आहे.
हेही वाचा- मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार- उद्धव ठाकरे
कोविड महामारीचे संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही असा संदेश जगभरात गेला असून भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता पण मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा तसेच नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की झाली आहे.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 12, 2021
भारत पहिल्यांदाच राष्ट्रीय महामारीचा मुकाबला करत नाही. यापूर्वी आलेल्या गोवर, देवी तसंच पोलिओचा मुकाबला भारताने समर्थपणे केला आहे. २० कोटी बालकांचं पोलिओ लसीकरण केलं त्यावेळी पोर्टल, अॅप, ओटीपी असं काही नव्हतं. तरीही ठोस धोरण आखून तत्कालीन काँग्रेस सरकारने पोलिओचे समूळ उच्चाटन करुन दाखवलं, ती धमक मोदी सरकारमध्ये दिसत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल यांनी कोरोना संकटाच्या गंभीर परिणामाचा इशारा मोदी सरकारला दिला होता. वेळीच त्यांचा सल्ला ऐकून कार्यवाही केली असती तर देशाला आजच्यासारख्या विदारक परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं.
केवळ सत्तेचा अहंकार व विरोधी पक्षाची दखल घ्यायची नाही या विकृत मानसिकतेतून केंद्रातील मंत्री, भाजपचे नेते हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्यात तसंच भाजपच्या आयटी सेलकडून ट्रोल करण्यातच वेळ घालवला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याबद्दलचं कालचं वक्तव्य हे सुद्धा त्यांच्या विकृत मानसिकतेतूनच तसंच सत्तेच्या मस्तवालपणातून आलं आहे. विरोधकांनी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी केली असती तर आज दिसत असलेलं भयनाक दृश्य पहावं लागलं नसतं, अशा शब्दांत भाजपवर नाना पटोले यांनी टीका केली.
(maharashtra congress president nana patole slams modi government on covid 19 pandemic situation handling)