कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करुन त्याला चालना देण्यात येईल. पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रांच्या अनुषंगाने व्यापक कार्य केलं जाईल, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी आश्वासन दिलं.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक धनंजय सावळकर उपस्थित होते. आमदार योगेश कदम, रत्नागिरी व सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
हेही वाचा- Beach Shacks: ८ समुद्रकिनाऱ्यांवर उभारणार बीच शॅक्स, तुम्हीही करू शकता अर्ज
यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोकणात बीच शॅक टुरीजम, टेंट टुरीजम, कॅराव्हॅन टुरीजम यासह कृषी पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव आहे. होम स्टेच्या माध्यमातून इथं लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. कोकणात पंचतारांकित हॉटेल्स गुंतवणूक करित आहेत. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करुन त्याला चालना देण्यात येईल. तसंच वेळोवेळी आढावा बैठक घेऊन कोकणाचा पर्यटन विकास व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देऊ, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, कोकणातील साने गुरुजी यांचे स्मारक, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं स्मारक आदी कामांना मंजुरी देऊन त्यास गती देण्यात यावी. त्याचबरोबर कोकणासह राज्यातील किल्ल्यांच्या विकासाला चालना देण्यात यावी. दुबईच्या धर्तीवर कोकणामध्ये ग्लोबल व्हिलेजसारखा पर्यटन उपक्रम राबविता येऊ शकेल.
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांना जोडणारं रस्त्यांचं जाळं मजबूत असावं. सर्व रस्ते दर्जेदार कसे होतील यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या. पर्यटकांसाठी शहरात सुरु करावयाच्या हॉप ऑन, हॉप ऑफ वाहतूक व्यवस्थेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
(maharashtra government approves beach shacks tourism policy for konkan says aaditya thackeray)