कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेला देशव्यापी लाॅकडाऊन ३ मे रोजी संपल्यानंतर परप्रांतीयांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यानुसार या सर्व परप्रांतीयांना पोहोचवण्याची जबाबदारी ही संबंधीत राज्य सरकारवर असणार आहेत. महाराष्ट्रात देखील ही तयारी सुरू करण्यात आली असून प्रशासन कामाला लागलं आहे. जिल्हानिहाय व्यवस्था बघण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ज्या परप्रांतीयांना राज्याबाहेर जायचं, असेल त्यांना आपल्या नावाचा फाॅर्म प्रशासनाला भरून द्यावा लागणार आहे. शिवाय लाॅकडाऊनमुळे महाराष्ट्रातच इतर ठिकाणी अडकून पडलेल्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल, तर त्यांनाही अशाच पद्धतीने फाॅर्म भरावा लागेल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 30, 2020
फाॅर्म 'इथं' मिळेल
यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका व्हिडिओ मेसेजमधून माहिती दिली आहे. ते म्हणाले की ज्या ज्या परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी जायचं आहे, त्यांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन एक फाॅर्म भरून द्यावा. फाॅर्ममधील माहितीनुसार आणि व्यक्तींच्या संख्येनुसार प्रशासनाकडून परप्रांतीय मजुरांच्या जाण्याची व्यवस्था टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. यासाठी राज्य सरकारने 02222023039/02222027990 हा नंबर देखील उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर फोन करून परप्रांतीय मजुरांना जाण्याच्या व्यवस्थेसंबंधी माहिती मिळू शकेल.
हेही वाचा - ‘याच’ अटींवर सोडता येईल महाराष्ट्र, परप्रांतीयांसाठी दिशानिर्देश जारी
लक्षणे नसावीत
लाॅकडाऊनमुळे (lockdown) राज्यासह राज्याबाहेर अडकलेले स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाकडून कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीची सर्व यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक व जबाबदारीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी प्रशासनाला दिले आहेत. झुंबड केल्यास किंवा शिस्त न पाळल्यास सर्व परवानगी रद्द करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
लॉकडाऊन मुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठीची महत्त्वपूर्ण माहिती. pic.twitter.com/szNxgf2z7s
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 1, 2020
राज्याबाहेर जाणाऱ्या किंवा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तींमध्ये कोरोनासंदर्भातील काहीही लक्षणे आढळल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे त्या व्यक्तीवर वैद्यकीय उपचार करण्यात येतील. इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या पत्रात संबंधित व्यक्तीस कुठलंही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेलं असणं आवश्यक असेल.
प्रवाशांची संपूर्ण यादी
ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे व उपचार घेणे त्या व्यक्तीवर बंधनकारक. ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडे देखील अशाच पद्धतीने राज्यांची संमतीपत्रे असणं आवश्यक असेल. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झिट पास, त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणं गरजेचं. यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधीही बंधनकारक. पाठपुराव्यासाठी ज्या स्थळी जे प्रवासी उतरणार आहेत, तशी यादी त्या त्या राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येईल.
हेही वाचा- झुंबड कराल, तर राज्याबाहेर जाण्याची परवानगी रद्द- उद्धव ठाकरे