Advertisement

१६ दिवसानंतर मराठा आंदोलकांचं उपोषण मागे!

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीनंतर संभाजी पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुढील १० दिवसांत राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर होणाऱ्या उद्रेकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाजन जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला.

१६ दिवसानंतर मराठा आंदोलकांचं उपोषण मागे!
SHARES

मराठा आरक्षणासहित विविध मागण्यांसाठी मागील १६ दिवसांपासून आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चातील आंदोलनांनी अखेर आपलं उपोषण शनिवारी सायंकाळी मागे घेतलं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीनंतर संभाजी पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुढील १० दिवसांत राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर होणाऱ्या उद्रेकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाजन जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला.


कुठल्या मागण्या?

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मोर्चादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्याच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत इ. विविध मागण्यांसाठी 'करो या मरो' या भूमिकेतून संभाजी पाटील यांच्यासहित एकूण १२ कार्यकर्ते आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. या उपोषणादरम्यान काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावून त्यांना रुग्णालयातही दाखल करावं लागलं. परंतु सरकारने या उपोषणाची म्हणावी तशी दखल न घेतल्याने जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला होता.


विरोधकांकडून टीका

दरम्यान सहकारमंत्री सुभाष देशमुख वगळता सरकारचा एकही प्रतिनिधी उपोषणकर्त्यांच्या भेटीला आला नाही. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणण्याची भूमिकाही घेतली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि धनंजय मुंडेनीही उपोषणकर्त्यांचं सांत्वन केलं.


सोळाव्या दिवशी जाग

यानंतर सोळाव्या दिवशी जाग येऊन अखेर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाटील आणि इतर उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर बोलताना महाजन म्हणाले की, ''उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. येत्या १५ दिवसांत तांत्रिक बाबी पूर्ण करत या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील.''


दिशाभूल करू नका

त्यावर प्रतिक्रिया देताना संभाजी पाटील म्हणाले, ''मुख्यमंत्री आणि महाजन यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आम्ही उपोषण मागे घेत आहोत. सरकारने आमच्या मागण्या येत्या अधिवेशनात मांडून त्या १० दिवसांत पूर्ण कराव्यात. जर सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर याच ठिकाणी पाणी न पिता आम्ही पुन्हा उपोषण सुरू करू. आझाद मैदान, मंत्रालय, वर्षा बंगल्याबाहेर उपोषणकर्ते बसतील. मग पुढे होणाऱ्या उद्रेकाला केवळ मुख्यमंत्री आणि महाजन जबाबदार असतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये.''



हेही वाचा- 

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजी पाटलांचं आमरण उपोषण

मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- राधाकृष्ण विखे-पाटील



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा