सीएसटी- मराठा समाजाच्या आजच्या परिस्थितीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच जबाबदार असल्याचं वक्तव्य मराठा सुराज्य संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रणय सावंत यांनी केलं आहे. पवारांच्या राजकारणामुळे मराठा समाज देशोधडीला लागला अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. मराठा समाजाच्या प्रश्नावर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबईतही स्वतंत्र मूक मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजासाठी आपण सातत्याने काम करीत आहोत. मराठा समाजाची जी काही अवस्था झाली आहे ,त्याला शरद पवार आणि मागील आघाडी सरकारच जबाबदार आहे. त्यांनी कधीही मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले नाहीत की ते सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. आता मराठा समाजाच्या मोर्चात चालणारे नेते त्यावेळी मराठा समाजाचे नाव घ्यायलाही तयार नव्हते, असेही सावंत म्हणाले. ते मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी 27 सप्टेंबर रोजी कोकणातील तीन जिल्ह्यांसह मुंबईतही मोर्चे काढण्यात येणार आहेत. हे मोर्चे देखील मूक मोर्चे असतील, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.