कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेना-भाजपात प्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून सावरण्यासाठी मनसेकडून ताबडतोब नवीन शहराध्यक्षाची निवड करण्यात आली असली, तरी पुन्हा इतर विभागांत देखील असे प्रकार होऊ नये म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय समित्या स्थापन करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवाय अमित ठाकरे यांच्यावरही एका लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई, दादर येथील राज ठाकरे (raj thackeray) यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाचा आढावा घेतानाच, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या रणनितीवर चर्चा झाली. सोबतच कल्याण-डोंबिवलीसारखा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी देखील या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे.
हेही वाचा- महापालिकेच्या शाळा होणार आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’
या बैठकीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, लवकरच येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय समित्या स्थापन करण्याचे निर्देश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. या माध्यमातून लोकसभा मतदारसंघासोबतच प्रत्येक वाॅर्डात पक्षाचं कामकाज कसं सुरू आहे, याची सविस्तर माहिती राज ठाकरे यांच्यापर्यंत विना अडथळा पोहोचण्यास मदत होणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यात मुंबईतील (mumbai) ६ लोकसभा मतदारसंघात समित्यांची स्थापना होईल, त्यानंतर ठाणे, पुणे, नाशिक अशा पद्धतीने समित्यांचा विस्तार होईल.
अमित ठाकरे (amit thackeray) यांच्या जबाबदारीविषयी विचारलं असता, बाळा नांदगावकर म्हणाले, इतर नेत्यांप्रमाणेच मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरही एका लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. मनसेचं नेतेपद हाती घेतल्यापासून मागील वर्षभरात त्यांनी जी कामगिरी करून दाखवली आहे, त्याचा आढावा घेऊनच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यांनी देखील ही जबाबदारी मोठ्या आत्मविश्वासाने स्वीकारली आहे. त्यांनी आतार्यंत जितक्या संयमाने आणि चांगल्या पद्धतीने काम करून दाखवलं आहे, त्याच आधारे ते ही जबाबदारी देखील यशस्वीपणे हाताळतील, अशी आम्हाला खात्री आहे, असं देखील बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.
(new responsibility on mns leader amit raj thackeray ahead of bmc election 2021)
हेही वाचा- शेवटी आपण ठरवायचं.. जाणता राजा, संजय मोनेंची पोस्ट वाचली का?