Advertisement

राजकारणातून निवृत्ती? प्रश्नच उद्भवत नाही- शरद पवार


राजकारणातून निवृत्ती? प्रश्नच उद्भवत नाही- शरद पवार
SHARES

वयाचा अमृतमहोत्सवी आणि विधिमंडळ तसंच संसदीय राजकारणात सुवर्णमहोत्सवी वर्षाचा पल्ला पार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार राजकारणाच्या मैदानातून बाहेर पडायला तयार नाहीत. विरोधकांना पुरून उरण्याची इर्षा आणि आत्मविश्वास आपल्यात कायम असल्याचे सूतोवाच शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल विचारल्या गेलेल्या पत्रकारांच्या प्रश्नाला खुमासदार शैलीत उत्तर देताना राजकारणातून निवृत्त होण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचं शरद पवार यांनी ठासून सांगितलं आहे. मंगळवारी मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार यांचं नाव देशाच्या राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून सातत्याने घेतलं जात आहे. मात्र, आपण राष्ट्रपतिपदाचे उमेदवार नसल्याचा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला. आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ त्यांनी अजून दीर्घकाळ राजकारणात कार्यरत राहण्याचा मनसूबा व्यक्त केला. राष्ट्रपती महोदयांची हवेली आपल्याला भावते, हे मान्य करत असतानाच पवार यांनी या हवेलीत वास्तव्याला गेल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी गाठीभेटी होत नसल्याची प्रेमळ तक्रारही त्यांनी केली.

देशाच्या राष्ट्रपतिपदासाठी कधी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे तर कधी विरोधकांचे उमेदवार म्हणून शरद पवार यांचं नाव चर्चेत राहिलं आहे. स्वतः पवार मात्र या चर्चेचं आणि पर्यायाने स्वतःच्या उमेदवारीचं खंडन करत आले आहेत. याखेपेस पुन्हा त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या नेमक्या याच वक्तव्यामुळे पवार यांची राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून दावेदारी वाढली आहे. शरद पवार ज्या विषयासाठी स्वतःची प्रतिकूलता दर्शवतात, भविष्यात त्याच विषयासाठी ते राजकीयदृष्ट्या अनुकूल होतात. आपण राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक नसल्याचं शरद पवार यांचं विधान त्यांच्या याच ‘पवारी’ शैलीसाठी गांभीर्याने घेतलं जाणार, याची शरद पवार यांना स्वाभाविकच कल्पना आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा