सुमारे १ लाख १० हजार कोटी रुपये खर्चाचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुलेटविरोधात उघड भूमिका घेतलेली असताना शिवसेनेही बुलेटविरोधात दंड थोपटले आहेत.
शुक्रवारी बुलेट ट्रेनविरोधी जनमंचाच्या शिष्टमंडळानं शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला जोरदार विरोध दर्शवत जनमंचाला पाठिंबा दर्शवल्याची माहिती जनमंचाचे रमाकांत पाटील यांनी दिली. बुलेट ट्रेनविरोधात ठाकरे बंधू एवटल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं पुढं नेमकं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असून या शेतजमिनी देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. मुळात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची गरजच नसल्याचं वारंवार समोर येत असतानाही केवळ पंतप्रधानांचं स्वप्न असल्यानं हा प्रकल्प पुढं रेटला जात असल्याचाही आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजकिय पक्षांकडून या प्रकल्पाला विरोधत होत आहेच पण शेतकरीही या प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी दयायच्या नाहीत असा निर्धार केला असून बुलेट ट्रेनविरोधात एकत्रित येत आता आवाज उठवण्यास सुरूवात केली आहे. त्यातूनच बुलेट ट्रेनविरोधीत जनमंचाची स्थापना करण्यात आली आहे.
या जनमंचातर्फे ३ जूनला पालघर इथं बुलेट ट्रेनविरोधातील भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यासाठी जनमंचानं शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी जनमंचाचं आमंत्रण स्वीकारत जनमंचाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता बुलेट ट्रेनवरून आणखी वातावरण तापणार असून बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा यानिमित्तानं रंगली आहे.
हेही वाचा-
बुलेट ट्रेनवर पुन्हा धडकलं मनसेचं इंजिन
गुजरातचा मुंबई हडपण्याचा डाव- राज ठाकरे
नाणारचं काय होणार? सेना बॅकफूटवर तर मुख्यमंत्री ठाम