संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो, अशी टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेना (shiv sena) खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी तितक्याच तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
केंद्रातील शेती कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणात आंदोलन सुरूच आहे. शेतकऱ्यांविरोधात लाठीचार्ज झाल्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वीच झाला होता. त्याला उद्देशून शेतकरी म्हणजे काय दहशतवादी आहेत काय? असा सवाल संजय राऊत यांनी मोदी सरकारला केला. हा देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा ही महत्त्वाची राज्यं आहेत. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसारखाच आहे. जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे, त्याला तुम्ही दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात, हा प्रकार निंदनीय असल्याचं संजय राऊत म्हणाले.
पंजाबचे शेतकरी जगासमोर आदर्श ठेवत अत्यंत शांततेत आंदोलन करत आहेत. तरीही या गरीब शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला जात आहे. असाच बळाचा वापर चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलं नसतं, असा टोलाही संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला.
त्यातच प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांना प्रत्युत्तर देताना कानाला, पोटाला, डोळ्याला, ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच माझी नेमणूक उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) केली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
तर उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशासंबंधी बोलताना, त्या शिवसैनिकच आहेत. त्यांच्यामुळे महिला आघाडी मजबूत होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
(shiv sena mp sanjay raut replies bjp leader chandrakant patil)