माझं नाव घेऊन कुणाला पब्लिसिटी स्टंट करायचा असेल तर खुशाल करा. पण मुंबई तुम्हाला पोसते. सर्व काही देते. त्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणीही उठून काहीही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. पोकळ धमक्या देत नाही. थेट कृती करतो, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारी बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचं नाव न घेता दिला आहे. (shiv sena mp sanjay raut slams kangana ranaut over hate comments on mumbai police)
त्याआधी कंगनाकडे कुठले पुरावे असतील, तर तिने केवळ सोशल मीडियावर व्यक्त न होता पोलिसांना पुरावे द्यावेत. तसंच कंगनाला मुंबईत इतकंच असुरक्षित वाटत असेल, तर तिने मुंबईत परत येऊ नये, असंही राऊत यांनी सुचवलं होतं.
त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे. तसंच मला मुंबईत येऊ नये असंही बजावलं आहे. मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे? असं वक्तव्य कंगना राणावतने केलं होतं.
त्यावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जर कोणी म्हणत असेल मी धमकी दिली तर मी पोकळ धमकी देत नाही, ते काम माझं नाही, असली नौटंकी मी करत नाही. मी शिवसैनिक असून थेट कृती करतो. मुंबईबाबत काहीही बरळणाऱ्या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात.
हेही वाचा - “मुंबई पोलिसांवर बोलणारी कंगना कोण लागून गेली”
Sanjay Raut Shiv Sena leader has given me an open threat and asked me not to come back to Mumbai, after Aazadi graffitis in Mumbai streets and now open threats, why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir? https://t.co/5V1VQLSxh1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 3, 2020
मुंबईला पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा कोणत्याही व्यक्तीला इथं राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही. ही मुंबई १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. १९९२ ची दंगल असो किंवा २६/११ चा दहशतवादी हल्ला मुंबई पोलिसांनी बलिदान देऊन लोकांना वाचवलं आहे. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही, वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
मुंबईला पाकिस्तान म्हणताना लाज वाटली पाहिजे. अशा प्रवृत्तींना जे पाठीशी घालत आहेत, त्या राजकीय पक्षांना मुंबई, महाराष्ट्रात मतं मागण्याचा अधिकार नाही. निवडून आलेल्यांना काय पाकड्यांनी मतदान केलं आहे का ? याचा खुलासा त्या पक्षाकडून होणं गरजेचं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपचं नाव न घेता टीका केली.
झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमची प्रेरणा आहे. झाशीची राणी महाराष्ट्राची वीरकन्या आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या टाकणारी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, तर हा झाशीच्या राणीचा सगळ्यात मोठा अपमान आहे आणि येथील राजकीय पक्ष जर झाशीच्या राणीचा अपमान करणार असतील तर देशाचं राष्ट्रीयत्व काही लोकांनी किती खालच्या स्तरावर नेऊन ठेवलं आहे हे स्पष्ट दिसतंय.