Advertisement

भाजपचा कलंकीत नेता

मिरा भाईंदरचे भाजपाचे माजी प्रमुख आणि माजी आमदार नरेंद्र मेहता सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आधीच कट्टर प्रतिस्पर्धी गीता जैन यांच्याकडून विधानसभा निवडणूक हारल्यानंतर आता पक्षातील महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आला.

भाजपचा कलंकीत नेता
SHARES

मिरा-भाईंदर भाजपाचे माजी प्रमुख आणि माजी आमदार नरेंद्र मेहता सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आधीच कट्टर प्रतिस्पर्धी गीता जैन यांच्याकडून विधानसभा निवडणूक हारल्यानंतर आता पक्षातील महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. या आरोपांवरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तिन्ही पक्ष एकत्रितपणे भाजपवर तुटून पडलेत. ठाण्यातील नवघर पोलीस ठाण्यामध्ये मेहता यांच्यावर बलात्कारासोबत इतरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढंच नाही, तर विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी मेहता यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांना दिले आहेत. मेहता यांच्यासोबतच शहर भाजपासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर लागलेला हा डाग कसा पुसायचा या चिंतेत सध्या सर्वच वरिष्ठ नेते आहेत.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ खरं तर एक स्टिंग आॅपरेशन आहे. मिरा-भाईंदर भाजपच्या नगरसेविका आणि महापौर पदाच्या उमेदवार नीला सोन्स यांनी हे स्टिंग आॅपरेशन करत व्हिडिओ व्हायरल केल्याचं सांगितलं जात आहे. नीला सोन्स २०१७ मध्ये झालेल्या मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. यंदाच्या महापौर निवडणुकीत मिरा भाईंदर महापालिकेचं महापौर पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने या जागेवर नीला साेन्स यांनी दावा ठोकला होता. परंतु पक्षाने त्यांच्याऐवजी जोन्सा हसनाळे यांना संधी दिली. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत अपेक्षेनुसार हसनाळे महापौरपदी विराजमान झाल्या. 

दरम्यानच्या काळात नीला सोन्स यांनी नरेंद्र मेहता (Bjp leader Narendra mehata) यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले.  मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नीला सोन्स यांनी स्वत: मेहता यांचं स्टिंग आॅपरेशन करून तो व्हिडिओ भाजपच्या (bjp) वरिष्ठ नेत्यांना पाठवला होता. परंतु भाजपच्या वरिष्ठांकडून योग्य ती दखल न घेण्यात आल्याने त्यांनी मेहतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. नरेंद्र मेहता यांच्यापासून आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

या प्रकरणाची दखल घेत विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर कारवाई करतानाच त्यांना माजी आमदार म्हणून मिळत असलेलं वेतन तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. पाठोपाठ त्यांच्या विरोधात नवघर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने मेहता अडचणीत सापडले आहेत.

गीता जैन भाजपच्या सदस्य असताना नरेंद्र मेहता यांच्या विरोधामुळेच जैन यांना निवडणुकीच्या आधी पक्षातून काढण्यात आल्याचं म्हटलं जातं. परंतु अपक्ष म्हणून निवडून आलेल्या जैन यांना नंतर भाजपने पाठिंबा दिल्यावर मेहता यांचं पक्षातील वजन कमी झालं.

त्यानंतर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यावर नरेंद्र मेहता यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे काही नगरसेवकही शिवसेनेत जाऊन दाखल झाल्याने भाजपला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. भाजपचा एकही नेता मेहता यांच्या बचावासाठी पुढं येत नसल्याने मेहता एकाकी पडले आहेत. त्यामुळे या सर्व कारवाईला सामोरं जाणं त्यांना नक्कीच जड जाणार आहे. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा