वसई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी रविवारी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले.
पक्षाचे नेते राजीव पाटील यांनी केलेलं बंड शमल्यानंतर रविवारी बहुजन विकास आघाडीचा पहिला कार्यकर्ता मेळावा विरारमध्ये संपन्न झाला. या मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांनी वसईतुन लढावे, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली. राजीव पाटील यांनी बंड केले नव्हते ते त्या विरोधक आणि माध्यमांनी वावडया उठवल्या होत्या, असेही ठाकूर यांनी सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचा मेळावा रविवारी विरारच्या ग्लोबल सिटी मध्ये संपन्न झाला. या मेळाव्यात संपूर्ण वसई विरार आणि पालघर जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 2019ची निवडणूक जिंकल्या नंतर हितेद्र ठाकूर यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.
त्यामुळे या मेळाव्यात हितेंद्र ठाकूर यांनी वसईमधून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यानी केली. ठाकूर यांचे भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर वसईतून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
हेही वाचा