देशातील शेअर बाजारांनी गुरूवारी पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकी गाठली अाहे. सेन्सेक्सने प्रथमच ३८ हजार अंशांची पातळी ओलांडली. दिवसाअखेरीस सेन्सेक्स १३७ अंकांची वाढ नोंदवत ३८ हजार २४ वर बंद झाला. तर निफ्टीही २१ अंकांची तेजी नोंदवत ११ हजार ४७१ वर स्थिरावला.
मागील काही दिवसांपासून सेन्सेक्स अाणि निफ्टी दररोज विक्रमी वाटचाल करत अाहेत. रोज सेन्सेक्स अादल्या दिवशीचा उच्चांक मोडत नवीन विक्रमी उच्चांक नोंदवत अाहे. गुरूवारी बँकिंग, वित्तीय सेवा अाणि रियल्टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स अाणि निफ्टीने एेतिहासिक उच्चांक गाठला. अायसीअायसीअाय बँक, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, एसबीअाय, अायटीसी अादी हेवीवेट शेअर्सने बाजारात तेजी अाणली. सेन्सेक्सने दिवसभरातील ३८,०७६.२३ चा उच्चांकी पातळी नोंदवली.
अांतरराष्ट्रीय नाणेनिधी (अायएमएफ) ने भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक वक्तव्य केल्याने बाजाराला सपोर्ट मिळाला. पुढील काही दशकांमध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल अाणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान अाता चीन असलेल्या स्थानी जाईल, असं अायएमएफने म्हटलं अाहे. नोटबंदीचा झटका अाणि जीएसटी लागू झाल्यामुळे अालेल्या अडचणींमधून भारतीय अर्थव्यवस्था अाता बाहेर अाली असल्याचेही अायएमएफ म्हटलं अाहे. भारताचा विकासदर २०१७-१८ मध्ये ६.७ टक्के अाणि २०१८-१९ मध्ये ७.३ टक्के राहण्याचा अंदाज अाहे.
हेही वाचा -
४० लाखांसाठी लटकली १५० कोटींची मालमत्ता, आढमुठ्या बिल्डरला महरेराचा दणका