राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचे मृत्यूही झाले आहेत. मुंबईतही कोरोनाने कहर केला आहे. अशा परिस्थितीत एका तरुणाने मात्र कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात देऊन मोठा दिलासा दिला आहे.
मालाड येथील ३१ वर्षीय शाहनवाज शेख हा तरूण ‘ऑक्सिजन मॅन’ (Oxygen Man) म्हणून प्रसिद्ध आहे. एका फोन कॉलद्वारे रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी तो कार्यरत आहे. मागील वर्षापासून मुंबईमध्ये कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी तो धडपड करत आहे. त्याच्या या दातृत्वामुळे आता तो सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. या ऑक्सिजन मॅनने परिसरातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी चक्क आपली २२ लाख रुपयांची एसयूव्ही कार विकली आहे.
आपली फोर्ड एन्डिव्हॉवर कार विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून शाहनवाजने १६० ऑक्सिजन सिलिंडर विकत घेतले. शाहनवाज म्हणाला की, गेल्या वर्षी गरिबांना मदत करताना पैशाची कमतरता भासली होती म्हणूनच त्याला आपली कार विकावी लागली.
गेल्या वर्षी ऑक्सिजनच्या अभावामुळे त्याच्या मित्राच्या पत्नीचा रिक्षामध्ये मृत्यू झाला. ही महिला सहा महिन्याची गरोदर होती. या महिलेला वेळीच ऑक्सिजन मिळाला असता तर तिचे प्राण वाचले असते असं शहानवाजला समजलं. तेव्हा त्याने स्वत:ची गाडी विकून ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने कोणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यास सुरुवात केली. लोकांना वेळेवर मदत मिळावी यासाठी शाहनवाजने एक हेल्पलाइन नंबरही जारी केला असून यासाठी नियंत्रण कक्ष उभारला आहे.
शहानवाजने सांगितलं की, बाजारामध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याचं दिसून आलं. माझ्या एका मित्राने मला थेट ऑक्सिजन सिलिंडर बनवणाऱ्याशी संपर्क करुन दिला. मी जेव्हा त्यांना सिलिंडर विकत घेऊन ते गरजूंना मोफत देण्याचा विचार करतोय असं सांगितलं तेव्हा त्यांनाही फार कौतुक वाटलं. त्यांनी मला खूप मदत केली.
ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्यांनी फोन करुन संपर्क साधल्यानंतर ऑक्सिजनची गरज असल्यासंदर्भातील डॉक्टरांचे शिफारस पत्र आणि स्वत: आमच्याकडून सिलिंडर घेऊन जाण्याची व्यवस्था करणे हे तुम्हाला करावं लागेल अशी आम्ही माहिती देतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजेच संपूर्ण कुटुंबच क्वारंटाइन झालं असेल तर आम्हीच ऑक्सिजन सिलिंडर नेऊन देतो. आम्ही मालाड ते हाजी आली असा प्रवास करुन सिलिंडर पोहचवला आहे. आमचे स्वयंसेवक घरामध्ये प्रवेश करत नाहीत. त्यांनी पीपीई कीट घातलेलं असतं. ते सोशल डिस्टन्सींग पाळतात, अशी माहिती शहानवाजने दिली.
हेही वाचा -