नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या आयआयटीने पुन्हा एकदा त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. २५ एप्रिल रोजी तेल आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय (ओएनजीसी) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सौरचूल स्पर्धेत मुंबईच्या आयआयटीने प्रथम क्रमांक पटकवला आहे.
ही चूल आयआयटीच्या तरुण शास्त्रज्ञांच्या एसओयूएलएस या टीमने बनवलेली आहे. त्यांना बक्षिस म्हणून १० लाख रुपये देण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर अशा १००० सौरचुली बनवण्याची ऑर्डरही ओएनजीसीने दिली आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी ओएनजीसीतर्फे नुकत्याच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी १५०० अर्जाची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली होती. त्यांनी सादर केलेल्या सौरचुलींच्या फॉर्म्युलाबाबत तज्ज्ञ समितीसमोर चर्चा झाली.
या समितीच्या अध्यक्षपदी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर होते. त्यानंतर या समितीने दीड हजार स्पर्धकांमधून २० जणांची निवड केली. या २० स्पर्धकांनी २४ फेब्रुवारी रोजी त्यांचं सौरचुलीचं मॉडेल सादर केलं. त्यानंतर त्यातून अंतिम ६ स्पर्धकांची निवड करून त्यातील प्रत्येकाला नवी दिल्ली येथे त्यांच्या सौरचुलीचे प्रात्यक्षिकं दाखवण्यास सांगितलं गेलं.
२३ एप्रिलला या सर्व सहा स्पर्धकांना दिवसाच्या वेळी तसेच सूर्यास्तानंतर त्यांच्या सौरचुलीवर विविध हिंदुस्थानी खाद्यपदार्थ बनवण्यास सांगितलं गेलं. त्यात आयआयटी मुंबईने सर्वांचं लक्ष वेधत प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.
हेही वाचा -