मध्य रेल्वे मार्गावरील लोकल प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकल सेवा अपुरी पडत असल्यानं प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळं प्रवाशांना होणार हा त्रास दूर करण्यासाठी व लोकल प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेनं कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत धीम्या मार्गावर १५ डबा लोकल प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. मागील २ वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला असून, अद्याप सर्वेक्षण आणि प्रकल्पाचा नियोजित खर्च किती यावरच काम सुरू आहे. परिणामी प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान ३ ते ४ वर्ष लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मध्य रेल्वेवर १२ वर्षांपूर्वी सीएसएमटी ते कल्याणपर्यंत एक १५ डबा जलद लोकल सुरू करण्यात आली. यासाठी सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकातील जलद मार्गावरील फलाटांची लांबी वाढवण्यात आली. या लोकल गाडीमुळे प्रवासी क्षमता वाढतानाच गर्दीच्या प्रवासातून थोडाफार दिलासा मिळू लागला. सध्या १५ डबा लोकलच्या दररोज १६ फेऱ्या होतात.
कल्याणपर्यंत १५ डबा लोकल सेवेचा विस्तार कर्जत, कसारापर्यंत करण्याचा निर्णय २ वर्षांपूर्वी घेण्यात आला. त्यासाठी कल्याणपुढील सर्व प्लॅटफॉर्मची लांबी वाढवतानाच काही ठिकाणी यार्डची कामे, सिग्नल, ओव्हरहेड वायरसह अन्य तांत्रिक कामे करावी लागतील, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे १५ डबा लोकल गाड्यांची संख्या वाढल्यावर फेऱ्या वाढल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.
कल्याण ते कर्जत मार्गावर १५ डबा प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) आणि कल्याण ते कसारा मार्गावर १५ डबाचे काम मध्य रेल्वेकडून केलं जाणार आहे. या दोन्ही मार्गावरील प्रकल्पाच्या खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे लवकरच मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामासाठी निविदा काढली जाणार आहे. त्यामुळं कल्याणनंतर १५ डबा चालवण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी ३ ते ४ वर्षे लागणार आहे.