पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे ते माहिम स्थानकादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात झाली आहे. बुधवारपासून सुरुवात करण्यात आली असून, हे काम १ मेपर्यंत चालणार आहे. या कामासाठी २५० कामगार कार्यरत आहेत. तसंच, सामाजिक अंतर आणि अन्य नियमांच्या पालनाचे मोठं आव्हान पश्चिम रेल्वे समोर आहे.
लॉकडाऊनदरम्यान पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकातील पादचारी पुलांची कामं बंदच आहेत. यात पश्चिम रेल्वेवरील २० आणि मध्य रेल्वेवरील १५ पुलांचा समावेश आहे. बंद असलेली कामं सुरू करण्यासाठी कंत्राटदारांना मुंबईतील स्थलांतरीत न झालेल्या कामगारांची मदत घेण्याची सूचना पश्चिम रेल्वेनं केली.
हे कामगार मिळताच वांद्रे ते माहिम दरम्यान मीठी नदीवरून जाणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या वाहनांची आणि लोकलची वाहतुक बंद असून पुलांच्या कामांना गती देणं शक्य होणार आहे. त्यामुळं या पुलाच्या कामाला २९ एप्रिलपासून सुरूवात करून १ मे पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.
उड्डाणपुलावर नवीन गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार असून, त्यासाठी २५० पेक्षा जास्त कामगाराची मदत घेण्यात आली आहे. याशिवाय २ मोठ्या आणि ८ छोट्या क्रेन, १८ जेसीबीही असल्याची पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली आहे. कामगारांमधे कंत्राटी आणि रेल्वे कामगारांचा समावेश आहे. सूपरवायजर आणि अन्य अधिकारी यांचीही कामावर देखरेख असेल. यात सामाजिक अंतर आणि अन्य नियम पालन केले जात आहे