बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना बेस्टनं चांगलाच दणका दिला आहे. महिन्याभरात बेस्टनं विनातिकीट प्रवास करणाऱ्या१० हजार फुकट्या प्रवाशांना पकडलं आहे. तर या फुकट्या प्रवाशांकडून ९ लाख ९६ हजार ६११ रुपये इतका दंड वसूल केला आहे.
बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून या फुकट्या प्रवाशांमुळे आधीच तोट्यात असणाऱ्या बेस्टचं आणखी आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बेस्टकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाते. या विशेष मोहिमेंतर्गत बेस्टनं जानेवारी २०१८ ते एप्रिल २०१८ या महिन्याभराच्या कालावधीत १० हजार फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील काही प्रवासी तिकीट न घेताच प्रवास करणारे असून काही प्रवासी खरेदी केलेल्या तिकीटाच्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणारे आहेत.
पोलिस कोठडी, दंडाची तरतूद
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात बेस्टकडून कडक कारवाई केली जाते. बेस्टच्या नियमानुसार अशा प्रवाशांकडून एकूण भाड्याच्या दहापट अधिक रक्कम दंड म्हणून वसूल केली जाते. तर यासंबंधीच्या कायद्यात फुकट्या प्रवाशांना एक महिन्याच्या पोलिस कोठडी किंवा २०० रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा अशी तरतुद आहे. याच कायद्यानुसार कारवाई करत बेस्टनं १० हजार फुकट्या प्रवाशांकडून ९ लाख ९६ हजार ६११ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बेस्टकडून आवाहन
बेस्टमधून प्रवास करताना योग्य तिकीट घेणं प्रत्येक प्रवाशाला बंधनकारक आहे. तर विनातिकीट प्रवास करणं हा गुन्हा आहे. त्यामुळं प्रवाशांनी योग्य तिकीट खरेदी करत किंवा वैध पास बाळगतच प्रवास करावा असं आवाहन यानिमित्तानं बेस्टनं केलं आहे.
हेही वाचा -
अखेर एसटी भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी, शुक्रवारपासून प्रवाशांना भुर्दंड
ईदनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या