गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, अनेकांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या गावी म्हणजे कोकणात जाण्यासाठी तयारी करत आहे. मात्र या गणेश भक्तांना यंदाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे. त्यानुसार, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीची अट कायम आहे. प्रवासाच्या ७२ तासांआधीचा 'आरटीपीसीआर' अहवाल किंवा २ लसमात्रा असल्या तरच कोकणात प्रवेश मिळेल, असं प्रशासनानं स्पष्ट करण्यात आलं आहे.
या दोन्हींपैकी काहीही नसल्यास गणेशभक्तांना एसटीचे थांबे किंवा रेल्वे स्थानकाबाहेर कोरोना चाचणी केंद्रावर चाचणीला सामोरे जावे लागेल. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी आतापर्यंत २ हजार १०९ एसटी गाड्या आरक्षित झाल्या आहेत. त्यात गट आरक्षणाच्या एसटींचाही समावेश आहे. मुंबई, ठाणे, पालघर तसेच पुण्यातून या गाड्या कोकणाकडे रवाना होतील.
४ सप्टेंबरला ४९ एसटी, ५ सप्टेंबरला ६६ एसटी सुटतील. ७ सप्टेंबरला ४०१ आणि ८ सप्टेंबरला सर्वाधिक १ हजार २२९ एसटी कोकणाच्या दिशेने जातील. याशिवाय २१७ हून अधिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. एकच मात्रा घेतलेल्या प्रवाशांनीही आरक्षण केले आहे. एसटी स्थानक, आगार आणि रेल्वे स्थानकाबाहेर कोरोना केंद्र उभारण्यात येणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्यांना ७२ तास आधीचा कोरोना चाचणी अहवाल सादर करावा लागेल किंवा २ लसमात्रा घेतल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. दोघांपैकी काही नसल्यास आगार किंवा स्थानकात उभारलेल्या कोरोना चाचणी केंद्रात चाचणी करण्याची सुविधा असेल. या चाचणीची सर्व माहिती प्रशासनाकडे असेल. कोकणात येताच प्रत्येक रेल्वे, एसटीतून येणाऱ्या प्रवाशांचे नाव, मोबाईल क्रमांक यासह सर्व यादी चालक, वाहक आणि रेल्वेडून इथं उपस्थित संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात येईल.
कोकणात आलेल्या प्रवाशांनी चाचणी न केल्यास त्याची माहिती त्वरीत उपलब्ध होईल आणि त्या व्यक्तीची गावात जाऊन ग्रामकृती दलाकडून चाचणीही होईल.
जिल्ह्यांच्या प्रवेशद्वारावर आरटीओ, पोलीस किंवा संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोरोना चाचणी अहवाल किंवा लसीकरण प्रमाणपत्र तपासले जाईल. तिथे कोरोना चाचणीचीही सुविधा असेल. खासगी वाहनानं कोकणात जाणाऱ्यांनाही कोरोना चाचणीला सामोरं जावं लागेल. ग्रामकृतीदलामार्फत चाचणीची सुविधा उपलब्ध असेल. कोरोनाबाधित आढळल्यास संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल.