राज्यात लॉकडाऊन (lockdown) करण्यात आल्यानं मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (mumbai local) बंद ठेवण्यात आली होती. मात्र 'मिशन बिगिन अगेन'च्या अंतर्गत लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. सुरुवातील केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी (essential workers) लोकल सुरु करण्यात आली असून आता इतर प्रवाशांना ही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. परंतु, अद्याप सामान्य प्रवासी व अपंग प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली नाही.
मध्य रेल्वेनं (central railway) अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह अपंग प्रवाशांनाही प्रवासाची परवानगी दिली आहे. पश्चिम रेल्वेकडून अपंग प्रवाशांना मज्जाव केला जात आहे. त्यामुळं रेल्वे कर्मचारी आणि अपंग प्रवाशांमध्ये वाद होत आहेत व अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. सरकारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच विविध श्रेणीतील अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी टप्प्याटप्यात दिली जात आहे.
मध्य रेल्वेनं अपंग, कर्करोगग्रस्तांबरोबर अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली. तसंच, अपंग प्रवाशांना त्यासंबंधीचे प्रमाणपत्र दाखवून लोकलच्या राखीव डब्यातून प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून अद्यापही अपंग प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिलेली नाही.
मागील काही दिवसांत अशा अनेक अपंग प्रवाशांना पश्चिम रेल्वेवर प्रवास नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अपंग प्रवाशांची समजूत काढताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्याही चांगलेच नाकीनऊ येत असून प्रसंगी खटके ही उडत आहेत.
हेही वाचा -
NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान
MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली