देशांतर्गत विमान प्रवास (domestic flights) आता १ जूनपासून महागणार आहे. इकॉनाॅमिक क्लासच्या प्रवासी भाड्यात (fares) १३ ते १६ टक्के वाढ करण्याचा निर्णय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) घेतला आहे. ही भाडेवाढ १ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पन्न घटलं आहे. या भाडीवाढीमुळे कोरोनाची झळ बसलेल्या विमान कंपन्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
इकॉनाॅमिक क्लासचे भाडे वाढवले असले तरी अप्पर क्लासचे भाडे मात्र कायम ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच्या कोरोना काळात २ महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर २५ मे २०२० रोजी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत विमान प्रवास भाडे ठरवून दिले होते. तेव्हापासून ते कायम आहे. मात्र, आता भाडेवाढ करण्यात आली आहे.
या भाडेवाढीनंतर इकॉनोमिक क्लासच्या ४० मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासासाठी असलेले किमान भाडे २,३०० रुपयांवरून २,६०० रुपये केले आहे. म्हणजे त्यात १३ टक्के वाढ केली आहे. ४० ते ६० मिनिटांच्या विमान प्रवासासाठी असलेले किमान भाडे २,९०० वरून ३,३०० रुपये केले आहे. ही भाडेवाढ १ जूनपासून अंमलात येणार आहे. अप्पर क्लासच्या देशांतर्गत विमान भाड्यात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही वाचा -
राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे यावे- मुख्यमंत्री