गेल्या काही कालावधीपासून एसटी बसेसमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आता कोणताही अनुचित प्रकार एसटी बसेस (ST buses) मध्ये घडू नये यासाठी एसटी महामंडळातर्फे काही ठोस पावले उचलण्यात येणार आहेत.
महिलांची सुरक्षा वाढवण्याच्या आणि सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (msrtc) त्यांच्या बसेसमध्ये पॅनिक बटणे (panick button) बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक बसस्थानकावर आणि नवीन येणाऱ्या बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच एसटी बसेसचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना दर्जेदार सुविधा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
राज्यातील (maharashtra) एसटी बसस्थानके आत्याधुनिक सेवा सुविधांनी तयार करण्यात येणार आहेत. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर बस स्थानकांच्या विकासाचे काम करण्यात येणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकार 'बांधा वापरा हस्तांतरित करा' म्हणजेच 'बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर' (BOT) आणि पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप' (PPP) मॉडेल्सचा वापर करून राज्यातील बस स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यास सज्ज आहे.
तसेच विकासक एसटी परिवहन महामंडळाच्या मालकीच्या जमिनीवर बस स्थानके, डेपो आणि प्रशासकीय कार्यालये यासह आवश्यक पायाभूत सुविधा बांधणार आहेत.
एसटी महामंडळाकडे सध्या 842 ठिकाणी सुमारे 1,360 हेक्टर जमीन आहे. जी शहरी, निम्न-शहरी आणि ग्रामीण भागात विभागली गेली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, अशा 66 ठिकाणांच्या विकासासाठी निविदा मागवल्या जातील.
निवडलेले विकासक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण पातळीवरील जमिनीचे अपग्रेडिंग करण्याची जबाबदारी घेतील, ज्यामुळे जमिनीचा कार्यक्षम वापर होईल आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ होईल.
"दर्जेदार सेवा प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देत, महाराष्ट्र परिवहन मंडळ सर्व बस स्थानकातील शौचालयांचे आधुनिकीकरण करेल जेणेकरून स्थानक परिसरात स्वच्छता राहील. प्रवाशांना स्वच्छ, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे," असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
ताफ्याला आणखी बळकटी देण्यासाठी महामंडळ टप्प्याटप्प्याने 25,000 नवीन बसेस समाविष्ट करणार आहे. या वर्षी, 2,640 नवीन 'लालपरी' बसेस जोडल्या जात आहेत, ज्यामध्ये राज्यभरातील 113 डेपोमध्ये 800 हून अधिक बसेस आधीच तैनात आहेत.
याव्यतिरिक्त, ग्रामीण मार्गांसाठी तयार केलेल्या 'मिडी' बसेस आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केलेल्या 200 वातानुकूलित स्लीपर बसेसचा समावेश असलेल्या 3,000 बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे," असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले.
दररोज 55 लाखांहून अधिक लोकांना सेवा देणारी एसटी बससेवा ही महाराष्ट्राची जीवनरेखा मानली जाते. सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि ताफ्याचा विस्तार या सर्वसमावेशक सुधारणांचा उद्देश महामंडळाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणार आहे.
हेही वाचा