लोकलच्या नव्या वेळापत्रकासाठी प्रवाशांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. यामुळे दादर-परळ स्थानकातून नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्याचा प्रस्ताव रखडला आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे प्रस्ताव रखडला, हे अद्याप अस्पष्ट आहे.
दादरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 10चे दुतर्फीकरण झाले आहे. यामुळे जलद लोकलमध्ये दोन्ही बाजूने ये-जा करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 11 या नव्या प्लॅटफॉर्मचा अधिक वापर व्हावा, यासाठी सीएसएमटीहून सुटणाऱ्या 10 फेऱ्या (5 अप आणि 5 डाउन) दादर स्थानकातून चालवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने केला होता.
मात्र ऑगस्टचा एक आठवडा उलटूनही त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. नवे वेळापत्रक लागू करण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेऊन लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कळवा आणि मुंब्रामधील रेल्वे प्रवाशांना नव्या वेळापत्रकामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत एका अतिरिक्त लोकलला दोन्ही स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
ठाणे स्थानकापर्यंत धावणाऱ्या 6 लोकलचा कल्याणपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याने दिवा, डोंबिवली, कल्याणमधील प्रवाशांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. यामुळे ठाणे ते कल्याणदरम्यान अधिक लोकल धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादरमधील रेल्वेगाड्यांचे बंचिग कमी करणे आणि दादर-परळ स्थानकातील प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक वापर करण्यासाठी नवे वेळापत्रक महत्त्वाचे ठरणार आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक 10 दुतर्फा केल्यामुळे दादर स्थानकातील मेल-एक्स्प्रेसची हाताळणी अधिक सोपी झाली आहे. एका मेल-एक्स्प्रेसमागे सुमारे एक ते दोन मिनिटांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे दादर ते कल्याण दिशेने लोकल चालवण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे.
दादर स्थानकातून लोकल चालवण्याचा आणि दादर स्थानकात लोकल थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वक्तशीरपणातही सुधारणा होण्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. सीएसएमटी ते दादर दरम्यान लोकल धावती करण्यासाठी जागा नसल्याने नव्या लोकलचा समावेश करण्यात आलेला नाही.
हेही वाचा