पश्चिम रेल्वे मार्गावर दुसरी एसी लोकल लवकरच धावणार आहे. दुसरी एसी लोकल ही चेन्नईच्या कारखान्यातून निघाली असून या आठवड्यात मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईतील उपनगरीय मार्गावर या लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर एसी लोकल सुरु करण्यसाठी रेल्वे सुरक्षा विभागाच्या आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या प्रक्रियेसाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
मुंबईत दाखल होणाऱ्या नव्या एसी लोकलच्या एका डब्यावर सौर पॅनल बसवण्यात आले आहेत. ३.६ किलोवॅट इतकी या पॅनलची क्षमता असून, डब्यातील दिवे आणि पंखे या पॅनलवर चालणार आहेत. त्यामुळं एसी लोकलमधील दिवे आणि पंखे सौर पॅनलवर चालण्याची ही चाचणी यशस्वी झाल्यावर इतर डब्यांमध्ये देखील ही सुविधा सुरु करण्यात येणार असल्याचे समजते आहे. तसंच, सौर पॅनल असणारी ही देशातील पहिली लोकल ठरणार आहे.
या नव्या एसी लोकलमधील आसन क्षमता अगोदरच्या एसी लोकलमधील आसन क्षमतेपेक्षा जास्त असून, ती १,११६ इतकी आहे. त्याचप्रमाणं एसी लोकलचा वेग वाढवण्याची आणि मंदावण्याची क्षमताही पहिल्या एसी लोकलपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळं या लोकलला दोन स्थानकांमधील अंतर कापण्यासाठी कमी अवधी लागणार आहे. त्यामुळं या दुसऱ्या एसी लोकलमधून प्रवास करायला कधी मिळणार याची उत्सुकता आता प्रवाशांना लागून राहिली आहे.
हेही वाचा -
महाशिवरात्री आणि होळीसाठी मध्य रेल्वेच्या १० विशेष गाडया
शिक्षकांच्या आंदोलनामुळे बारावीचे निकाल रखडणार