वेतनवाढीच्या मुद्यावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी ) कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून रोजी कामबंद आंदोलन पुकारलं होतं. अचानक करण्यात आलेल्या या संपात मुंबईसह राज्यभरातील कर्मचारी सहभागी झाले. संपादरम्यान अनेक एसटी बसेस अडवून फोडल्या. काही गाड्यांवर दगडफेकही करण्यात अाली. यामध्ये एसटीचं मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळं संपात सहभागी कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला अाहे. मुंबईतील १३८ तर मुंबईबाहेरील १०१० अशा एकूण ११४८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. तर सुत्रांनी मुंबई लाइव्हला दिलेल्या माहितीनुसार, सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर आता नवीन भरती प्रक्रियेतील प्रतिक्षा यादीवरील ३ हजार उमेदवारांमधून भरती केली जाणार आहे. त्यामुळे ११४८ कर्मचाऱ्यांना संप महागात पडला अाहे. तर दुसरीकडं प्रतिक्षा यादीवर उमेदवारांना लाॅटरी लागली आहे.
एसटीमध्ये नव्या भरती प्रक्रियेअंतर्गत अंदाजे ९ हजार कर्मचाऱ्यांची रोजंदारीवर भरती करण्यात आली आहे. १८० दिवस पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलं जातं. असं असताना संपात १८० दिवस पूर्ण न झालेले कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. संपादरम्यान शिवशाहीच्या १९ बसगाड्यांसह ९३ बसगाड्यांचं संपकऱ्यांनी नुकसान केलं. तर संपामुळं आधीच तोट्यात असलेल्या एसटीला ३३ कोटींचं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे नव्यानं सेवेत रूजू झालेले असतानाही संपात सहभागी होऊन एसटीचं नुकसान करणाऱ्या ११४८ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची प्रशासनानं सेवा समाप्त केली आहे.
सेवा समाप्त झालेल्यांमध्ये मुंबईतील परळ आगारातील ३८, कुर्ला आगारातील २२ आणि पनवेल आगारातील १८ कर्मचारी अाहेत. यापुढंही अन्य कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. या कारवाईविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे. संतप्त कर्मचाऱ्यांनी आता या कारवाईविरोधातच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर काही संघटनांनी याविरोधात थेट न्यायालयात धाव घेण्याचीही तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हा कारवाईचा मुद्दा येत्या काळात चिघळण्याची शक्यता असून पुन्हा एसटी प्रशासन विरूद्ध कर्मचारी असा वाद तीव्र होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण
सर्वच महिला प्रवाशांना प्रथम श्रेणीच्या सुविधा