मुंबईत दिवसेंदिवस वाढणाऱ्या खासगी वाहनांमुळं ठिकठिकाणी प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूककोंडीमुळं मुंबईकरांना कोणत्याही कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी खूपचं उशीर होतो. मुंबईच्या या वाहतूककोंडीनं जागतिक विक्रम केला असून, जगातील सर्वात जास्त वाहतूककोंडीचं शहर म्हणून आता मुंबईची ओळख झाली आहे. टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८ च्या सर्व्हेतून हा निष्कर्ष समोर आला आहे. सर्वाधिक वाहतूककोंडी असणाऱ्या शहरांच्या यादींमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर तर राजधानी दिल्ली चौथ्या स्थानावर आहे.
जगभरातील सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या ४०० शहरांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला आहे. या ४०० शहरांमध्ये वाहतूककोंडीच्या बाबतीत मुंबई अव्वल क्रमांकावर आहे. टोमटोम ट्राफीक इंडेक्सनं केलेल्या सर्वेक्षणात प्रामुख्यानं वेगवेगळ्या शहरांमधील वाहतुकीचा वेग आणि वाहतूककोंडीसंदर्भातील पाहणी करुन निरिक्षणं नोंदवली आहेत.
मुंबईत वाहतूककोंडी इतकी वाढली आहे की, मुंबईकरांना कोणतंही अंतर पार करण्यासाठी एकूण वेळेपेक्षा ६५ टक्के अधिक वेळ लागतो. मात्र, दिल्लीत एकूण वेळेच्या ५८ टक्के अधिक वेळ लागत आहे. त्यामुळं मुंबईनं एका नव्या विक्रमाला गवसणी घातली, असं म्हणायला हरकत नाही.
१. भारताची आर्थिक राजधानी मुंबई चा या यादीमध्ये पहिला क्रमांक लागतो.
२. मुंबई शहराचा या यादीमध्ये पहिला क्रमांक असून दुसऱ्या क्रमांकावर कोलंबियाची राजधानी असलेले बोगोटा हे शहर आहे. बोगोटामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला अपेक्षेपेहून ६३ टक्के अधिक वेळ लागतो.
३. दक्षिण अमेरेकेमधील पेरू देशाची राजधानी असणारे लिमा शहर या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरामध्ये वाहतूक कोंडीमुळं नियोजित स्थळी पोहचण्यासाठी अपेक्षित वेळेहून ५८ टक्के अधिक काळ लागतो.
४. चौथ्या स्थानावर भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहराचा क्रमांक या यादीत लागतो. दिल्लीमध्ये एका जागेहून दुसऱ्या जागी जाताना अपेक्षेहून ५८ टक्के अधिक काळ लागतो.
५. रशियाची राजधानी असलेले मॉस्को हे शहर ‘टॉमटॉम’ने तयार केलेल्या या यादीत पाचव्या स्थानावर आहे. वाहतूक कोंडीमुळे मॉस्कोमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ५६ टक्के जास्त वेळ लागतो.
हेही वाचा -
मुंबईतील २९ पूल धोकादायक, १२ पुलांचा वापर पूर्णपणे बंद
जुलैत बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन