कोरोना काळात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटि पुढे येऊन गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी १०० ऑक्सिजन कंसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती स्वतः ट्विंकल खन्नानं सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
ट्विंकल खन्नानं एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 'लंडनच्या दोन डॉक्टर्सनी १२० ऑक्सिजन कंसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच मी आणि अक्षयनं १०० ऑक्सिजन कंसन्ट्रेटरची व्यवस्था केली आहे. अशाप्रकारे एकूण २२० कंसन्ट्रेटरचं दान केले जाणार आहे. एकत्र येऊन योगदान करुयात.'
ट्विंकल खन्नानं त्याआधी एका पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'कृपया मला रजिस्ट्रेशन झालेल्या आणि विश्वासार्ह एनजीओंची माहिती द्या. जे १०० ऑक्सिजन कंसन्ट्रेटरचे (प्रति मिनिट 4 लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करणारे) वाटप करण्यास मदत करतील. हे कंसन्ट्रेटर थेट लंडनवरून त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील.'
मागील वर्षी अक्षयनं कोरोनासाठी पीएम केअर्स फंडमध्ये २५ कोटी रुपये दान केले होते. याशिवाय त्याने काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या एका संस्थेला एक कोटी रुपये दान केले आहेत. गौतम गंभीरची ही संस्था गरीबांसाठी जेवणाची सोय करते.
हेही वाचा