बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कोरोनाबाधित झाल्यापासून ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांचे लाखो फॅन्स दररोज प्रार्थना करत आहेत. याचदरम्यान अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार, असं वृत्त सगळीकडे पसरलं. परंतु हे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यात कुठंही तथ्य नसल्याचा खुलासा स्वत: अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केला आहे.
एका वृत्तवाहिनीची न्यूज क्लिप आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करताना बिग बी अमिताभ यांनी लिहिलं आहे की, हे वृत्त चुकीचं आहे. बेजबाबदार आणि असंशोधनीय खोटं आहे.
अमिताभ यांच्या ट्विटनंतर हे स्पष्ट झालं आहे की अजून तरी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेली नाही. तसंच त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांना रुग्णालयातून कधी डिस्चार्ज देण्यात येईल, हे देखील स्पष्ट नाही.
हेही वाचा- Amitabh Bahachan: अमिताभ यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, लवकरच मिळणार डिस्चार्ज
.. this news is incorrect , irresponsible , fake and an incorrigible LIE !! https://t.co/uI2xIjMsUU
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 23, 2020
कोरोनाची लागण झाल्यामुळे अमिताभ बच्चन यांना ११ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमिताभ यांच्या सोबतच त्यांचे चिरंजीव आणि अभिनेता अभिषेक बच्चन देखील कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर अभिषेक याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची ८ वर्षांची मुलगी आराध्या ‘जलसा’ बंगल्यात होम क्वारंटाईन होत्या. परंतु ताप, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर या दोघींनाही १७ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अमिताभ यांचे फॅन्स जगभरात पसरलेले आहेत. ते रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. कोरोनावर मात करून अमिताभ पुन्हा लवकर घरी परततील अशी अपेक्षा सर्वजण करत आहेत.
हेही वाचा- ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या नानावटी रुग्णालयात दाखल