थोरल्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत विकी कौशलचा भाऊ सनीही अभिनयाकडे वळला आहे. आजवर सहाय्यक भूमिकांमध्ये दिसलेला सनी आता राधिका मदानसोबत जोडी जमवत मुख्य नायक बनला आहे.
दिग्दर्शक दिनेश विजान यांनी मॅडहाक फिल्म्सच्या बॅनऱखाली ‘शिद्दत’ या आगमी हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत झळकणार असून, ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटाद्वारे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री राधिका मदानसोबत त्याची जोडी जमली आहे. ही दोन प्रेमी युगुलांची कहाणी असल्यानं सनी-राधिकासोबत या चित्रपटात मोहित रैना आणि डायना पेंटी ही जोडीही दिसणार आहे. श्रीधर राघवन आणि धीरज रतन यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन कुणाल देशमुख करणार आहे. कुणालनं यापूर्वी ‘जहर’, ‘कलियुग’, ‘जन्नत’, ‘जन्नत २’ या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. दिनेश विजान आणि भूषण कुमार ‘शिद्दत’चे निर्माते आहेत. खरं तर निर्माता-दिग्दर्शक करण जोहर ‘शिद्दत’ या टायटल अंतर्गत महत्त्वपूर्ण चित्रपट बनवणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट आणि वरुण धवन ही जोडी पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याची करणची योजना होती, पण वास्तवात करणनं या चित्रपटाची घोषणाच केली नाही. त्यामुळं विजान यांनी ‘शिद्दत’ हे टायटल आपल्या नावे केल्याचं समजतं.
दिनेश यांनी ‘शिद्दत’ची घोषणा केली असली, तरी प्रदर्शनाची मात्र निश्चित नाही. दिनेश सध्या ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाच्या निर्मितीत बिझी आहेत. ‘हिंदी मीडियम’चा सिक्वेल असलेल्या या चित्रपटात इरफान खानसह करीना कपूर आणि राधिका मदान यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात राधिकानं दिनेश यांना इम्प्रेस केल्यानं ‘शिद्दत’मध्येही तिची वर्णी लागल्याचं बोललं जात आहे. सनीबाबत सांगायचं तर त्यानं यापूर्वी अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’मध्ये हिम्मत सिंग ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यामुळं या चित्रपटात राधिका-सनीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षित करते का ते पहायचं आहे.
हेही वाचा -
करण ओबेराॅयचा जामिन अर्ज फेटाळला
मणीसाठी ऐश्वर्या बनणार खलनायिका